नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अजनी रेल्वे परिसरात पीडब्लूआय कार्यालयाच्या परिसरात लाखो रुपयांची गिट्टी पडून आहे. मागील दोन वर्षांपासून या गिट्टीचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कामच नव्हते, तर लाखो रुपयांची गिट्टी खरेदी कशाला केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अजनी रेल्वेस्थानकाच्या बाजुला पीडब्लूआय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मार्गावर गिट्टीचे मोठमोठे ढीग मागील दोन वर्षांपासून पडून आहेत. या गिट्टीची किंमतही लाखो रुपये आहे. दोन वर्षांपासून या गिट्टीचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गिट्टीवर हिरवळ पसरली असून, हे ढीग दिसेनासे झाले आहेत. रेल्वेला एवढ्या मोठ्या प्रमाणात गिट्टीचे काम नव्हते, तर लाखो रुपयांची गिट्टी खरेदीच कशाला केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विनाकारण गिट्टी खरेदी करून लाखो रुपयांचा चुराडा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे कर्मचारी करीत आहेत. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता या गिट्टीचा बांधकामासाठी वापर होणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले. परंतु बांधकामासाठी मागील दोन वर्षात ही गिट्टी वापरण्यात आली नाही. बाजारात गिट्टी सहज उपलब्ध होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गिट्टी साठविण्याची गरज नसल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
................
बांधकामासाठी वापर होणार
‘अजनी रेल्वे परिसरात पडून असलेली गिट्टी बांधकामासाठी खरेदी करण्यात आली आहे. या गिट्टीचा रेल्वे रुळाच्या देखभालीसाठी तसेच बांधकामासाठी वापर करण्यात येणार आहे.’
- एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
..........