वर्षभरापूर्वीच काम पूर्ण : वाहतूक सुरू होणार वसीम कुरैशी - नागपूरछिंदवाडा रोडवरील बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाण पुलाचे काम या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार आहे. येत्या १ आॅगस्टपासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असा दावा पुलाचे काम करणाऱ्या कंपनीने केला आहे. या प्रकल्पाचे काम २०१५ पर्यंत पूर्ण होणार होते. परंतु एक वर्षापूर्वीच प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येत आहे, हे विशेष. या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून छिंदवाडा रेल्वे क्रॉसिंग (१६ डी) च्या वरील ४८.४ मीटरचेच काम शिल्लक राहिले आहे. यामध्ये गर्डर टाकण्यात आले आहेत. पुढील आठवड्यापर्यंत क्राँक्रिट टाकण्यात येईल आणि १ आॅगस्टपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल. नागपूर -बैतुल हायवे क्रमांक ६९ वरील मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर आतापर्यंत नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. येथून दर ५ किंवा १० मिनिटांनी एक रेल्वेगाडी जाते. त्यामुळे येथील रेल्वे फाटक वारंवार बंद करावे लागत असल्याने वाहन चालकांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आॅफिस किंवा तातडीच्या कामासाठी जात असलेले वाहन चालक रेल्वे फाटक पार करण्याच्या घाईत असताना नेहमीच वाहन चालकांमध्ये वाद होतात. परंतु आता ही समस्या केवळ १५ दिवस आणखी सहन करावी लागेल. पुलाचे काम जोरात सुरू आहे. मानकापूर रेल्वे क्रॉसिंग ग्रांट रुटवर आहे. त्यामुळे ही रेल्वे लाईन नेहमीच व्यस्त असते. ६६० टन वजनी क्रेनच्या साहाय्याने ६५ टन वजनी लोखंडाचे ८ गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.रेल्वेपेक्षा रस्त्याने लवकर पोहोचणार नागपूरवरून बैतुलला पोहचण्यासाठी रेल्वेने २.५० ते ३ तास लागतात. मानकापूर रेल्वे उड्डाणपुलासह आणखी पाच पूल बनल्यामुळे आता रस्त्याने २.१५ तासातच पोहचता येईल. या हायवेवर महाराष्ट्रात मानकापूर, कोराडी रोड (गोधनीजवळ) आणि फॉच्युन फॅक्टरी (पाटणसांवगी) येथे तर मध्यप्रदेशात चिचोंडा येथे रेल्वे उड्डाणपूल बनविण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या सर्वांचीच सोय होणार आहे. नागरिकांचा त्रास लवकरच संपणार प्रोजेक्ट डायरेक्टर जे.पी. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निकल एक्स्पर्ट हरनेकसिंह आणि प्रकल्प व्यवस्थापक राकेश भारद्वाज आणि इतर अधिकाऱ्यांच्या आपसी सामंजस्यामुळे प्रकल्पाचे काम नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण होत आहे. जुलैच्या शेवटपर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊन आॅगस्टपासून तो वाहतुकीसाठी खुला होईल. या कामासाठी एनएचएआयतर्फे २४ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली होती. कंत्राटदार कंपनीच्या कामाची गती संतोषजनक आहे. या पुलाच्या कामामुळे नागरिकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या कामात त्यांचे मोठे योगदान आहे. आता पुलाचे काम तातडीने पूर्ण होत असल्याने नागरिकांचाही त्रास लवकरच संपणार आहे. -एम. चंद्रशेखर, प्रकल्प व्यवस्थापक-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)
मानकापूर रेल्वे उड्डाणपूल आॅगस्टपासून खुला
By admin | Updated: July 17, 2014 01:06 IST