एन्क्लोझर क्र. ३ मध्ये मुक्काम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या महाराजबागेतील ‘ली’ नावाच्या वाघिणीची अखेर मंगळवारी सायंकाळी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये रवानगी झाली. मात्र यासाठी गोरेवाडा वन विभागाला चांगलीच कसरत करावी लागली. वन विभाग आणि महाराजबाग प्रशासनातर्फे ‘ली’च्या स्थानांतरणासाठी मागील शनिवारपासून प्रयत्न चालविले होते. त्यासाठी महाराजबागेतील ‘ली’च्या पिंजऱ्याशेजारी वाहतूक पिंजरा लावण्यात आला होता. परंतु गत तीन दिवसांपासून ती त्या वाहतूक पिंजऱ्यात शिरत नव्हती. यामुळे वन विभागाला तिचे स्थानांतरण तूर्तास स्थगित करावे लागले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी अखेर ती वन विभागाच्या पिंजऱ्यात शिरली आणि वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. यानंतर तिला लगेच सायं. ५ ते ५.३० वाजता दरम्यान गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे रवाना करण्यात आले. गोरेवाडा येथील वन अधिकाऱ्यांच्या मते, सध्या तिला येथील एन्क्लोझर क्र. ३ मध्ये ठेवण्यात आले आहे; शिवाय पुढील काहीच दिवसांत तिला ‘साहेबराव’च्या पिंजऱ्यात सोडले जाऊ शकते. मात्र सध्या तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. ‘साहेबराव’ हा सध्या येथील एन्क्लोझर क्र. १ मध्ये असून, त्याच्या शेजारी एन्क्लोझर क्र. २ मध्ये अलीकडेच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून आणलेल्या नरभक्षक वाघिणीला ठेवण्यात आले आहे. माहिती सूत्रानुसार, वन विभाग गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये ‘ब्रीडिंग’ करण्याचा विचार करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ली’ला गोरेवाड्यात स्थानांतरित करण्यात आले.
‘ली’ अखेर साहेबरावांकडे! चार दिवसांची कसरत :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:24 IST