लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावात संजीवनी ठरणाऱ्या रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या औषधावर सरकारने नियंत्रण आणले असतानाही ते उपलब्ध होत नाही. शिवाय, जिल्हा प्रशासनानेही रुग्णांच्या तत्कालीन प्रकृतीनुसार रेमडेसिविर देण्याची गरज स्पष्ट केली आहे आणि अवाजवी मागणीवर कारवाईचा इशारा दिला आहे. या स्थितीची जाणीव असतानाही, कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार करणारे खाजगी हॉस्पिटल्स संबंधितांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिविर आणण्याचे सांगत आहेत. आप्तांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक धावपळ करीत आहेत आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजत आहेत. अशातऱ्हेने कोरोना संक्रमण आणि औषधांबाबतची परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. यावरून निर्माण झालेला रेमडेसिविरचा तुटवडा नेमका नैसर्गिक की कृत्रिम, अशी शंका उपस्थित व्हायला लागली आहे.
दोन दिवसाआधी ५७७ ते ५,४०० रुपये मूळ किंमत असलेलेले विविध कंपन्यांचे रेमडेसिविर तुटवड्यामुळे मागच्या दारातून १५ हजार रुपयापर्यंत विकले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशावरून नागपुरात रेमडेसिविरचा मोठ्ठा साठा रविवारपर्यंत उपलब्ध होईल, असे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतरही रेमडेसिविरबाबतचा तुटवडा संपलेला नाही. सोमवारी काळ्याबाजारात रेमडेसिविरच्या एका इंजेक्शनची किंमत २० ते २५ हजार रुपयापर्यंत पोहोचली होती. नागपुरात विक्रीची परवानगी असलेल्या चार औषधालयांमध्येही, रविवारपासून रेमडेसिविर उपलब्ध झालेले नाही. शासकीय हॉस्पिटल्समध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असतानाही, काही रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी बाहेर धावपळ करीत आहेत. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्याला कारण रेमडेसिविर वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही, अशी कारणेही दिली जात आहेत. त्यामुळे, एकीकडे शासकीय इस्पितळे व नेमलेल्या औषधालयांनाच रेमडेसिविर परवानगी असतानाही आणि तेथे साठा उपलब्ध नसतानाही काळ्याबाजारात हे औषध विकले जाते कसे, हा प्रश्न निर्माण होतो. आपात्कालीन परिस्थितीतही औषधांचा काळाबाजार करून टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांवर शासनाने नियंत्रण नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
-------------------
हॉस्पिटलच्या बाहेरच चढ्या किमतीत विक्री
शासकीय रुग्णालयात शासकीय धोरणानुसार रेमडेसिविरची उपलब्धता स्थिती हाताळण्यापुरती आहे. मात्र, खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविरसाठी घासाघीस करावी लागत आहे. विशेष म्हणजे, एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाला दुसऱ्या खाजगी रुग्णालयाच्या बाहेर रेमडेसिविर चढ्या किमतीत उपलब्ध करवून दिले जात आहे. ही स्थिती परस्परविरोधाभासी आहे.
-------------
जिल्हा प्रशासनाचे निर्देश
कोरोना संक्रमित ई व एफ श्रेणीतील रुग्णांसाठीच रेमडेसिविरचा उपयोग करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने रविवारी दिले आहेत. या निर्देशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.