लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : शहरासह पारशिवनी तालुक्यात काेराेना संक्रमण वाढत असताना काेविड केअर सेंटरची कमतरता भासायला लागली. ही समस्या साेडविण्यासाठी वेकाेलि प्रशासनाने त्यांच्या टेकाडी (कन्हान) येथील जवाहरलाल नेहरू हाॅस्पिटलमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यास अनुमती दिल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी ४६ खाटांची व्यवस्था करण्याचा व राज्य शासनाच्यावतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे मध्यंतरी पारशिवनी तालुक्याच्या दाैऱ्यावर आले हाेते. त्यावेळी त्यांनी तालुक्यात काेविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत स्थानिक लाेकप्रतिनिधी व नागरिकांना आश्वासन दिले हाेते. त्यामुळे प्रशासनाने यासाठी सुयाेग्य जागा शाेधायला सुरुवात केली. त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व वेकोलिचे नागपूर क्षेत्र महाप्रबंधक आभरचंद्र सिंह यांच्यात चर्चा घडवून आणली.
यात आभरचंद्र सिंह यांनी टेकाडी येथील वेकाेलिच्या हाॅस्पिटलमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यास अनुमती दिल्याने हा मार्ग माेकळा झाला. या ठिकाणी ४६ खाटांची साेय करण्यात येणार असून, राज्य शासनाच्यावतीने १० नर्सची नियुक्ती केली जाणार असल्याचेही प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, पंचायत समिती सभापती मीना कावळे, इंटकचे नागपूर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास वियनवार, पंचायत समिती सदस्य करुणा भोवते, श्यामकुमार बर्वे यांनी रविवारी या हाॅस्पिटलची पाहणी केली.