नागपूर : मृत्यू शाश्वत असतो आणि कदाचित जीवनही. लौकिकार्थाने केवळ मानवी देहाचे असणे म्हणजे जीवन असे मानले गेले तरी अध्यात्मशास्त्राप्रमाणे जीवनही शाश्वतच असते. विविध विचारधारांमध्ये हा वादाचा मुद्दा असला तरी मानवी जीवनच सर्वार्थाने मान्य केले गेले आहे.मृत्यू हा छोटासा थांबा आणि पुन्हा जीवनाला नव्याने प्रारंभ होतो, असेही मानले जाते. अर्थात विज्ञानाचा आधार घेतला तर ऊर्जा कधीच संपत नाही पण त्याचे रूपांतर दुसऱ्या स्वरूपात होते. तरीही माणसाला कायम भौतिक जीवनाची, देहाची आसक्ती असते. प्रत्येकालाच इतक्या उंच पातळीवर जाता येणे शक्य नाही पण एखाद्या निमित्ताने मानवाला हा आत्मप्रत्यय दिला आणि त्यातून सृजनशील कविता जन्माला आली तर ती वाचकांना विचार करायला भाग पाडते. डॉ. अरुणा देशमुख यांनी कॅन्सरशी संघर्ष करताना आलेल्या अनुभवांचा, वेदनांचा आणि मृत्यूच्या जवळ असण्याचा अनुभव कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला. अवघ्या तीन-चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले आणि आज नियतीने त्यांना आपल्यापासून हिरावले. त्यांच्याच कवितेच्या ओळीत ‘पण सार काही शांत झालय आता...’‘हा उधळता वादळी वारा थांबलाय आता, ठेवल्या आहेत त्याने वादळाच्या खाणाखुणा, पण सारं काही शांत झालय आता....। जगण्याच्या आदिम इच्छांचे जुळतील तंबोरे आणि रंगेल मेहफिल पुन्हा एकदा माझ्यातल्या जीवस्पंदाची...’ अरुणातार्इंच्या ‘कॅन्सरच्या कविता’ या कवितासंग्रहातील अखेरच्या कवितेची ही अखेरची ओळ. जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादही त्यांनी यातून व्यक्त केला पण नियतीपुढे सारेच हतबल ठरतात. कॅन्सरच्या वेदना आणि मृत्यूशी येणारा सबंध, त्यातली अनिश्चितता कवी ग्रेस यांनीही ललितबंधातून व्यक्त केली. अनेकांनी हा आत्मप्रत्यय लेखनातून मांडला पण एखाद्या कवयित्रीने जीवनाचा आशावाद आणि मृत्यूच्या शाश्वतेची प्रत्यक्ष अनूभूती घेऊन कविता लिहिणे, हा मराठीतला कदाचित पहिलाच आणि त्यामुळेच महत्त्वाचा प्रसंग आहे. ही प्रत्यक्ष अनुभूती कवितेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत येते तेव्हा रसिकही विचारप्रवृत्त होतात. बुद्धीप्रामाण्यवादी लेखन करणाऱ्या डॉ. देशमुख यांच्या कवितेत जगण्याची तीव्र इच्छा आहे. व्यक्तीच्या दु:खातून समष्टीपर्यंत जाताना स्व ला ओळखण्याचाही प्रयत्न आहे. त्यांची कविता देहभानातून अस्तित्व भानाकडे जाणारी आहे. मृत्यू येणार असतोच, तो टाळता येत नाही पण त्याच्याशी लढण्याची आणि त्याला अजून काही वर्षे थोपवून धरण्याच्या जीवनेच्छेची ही कविता लिहिणाऱ्या अरुणाताई आता अनंतात विलीन झाल्या आहेत. कॅन्सरवर मात करण्याची त्यांची जिद्द पाहता त्या यातून नक्कीच बाहेर पडतील, असा विश्वास असताना त्यांचे निघून जाणे धक्का देणारे आहे. स्वत:ला आपला स्व सापडणे आणि त्याचा प्रत्यय होणे यापेक्षा अधिक काही शोधायचे उरत नाही. अरुणातार्इंना ही वाट गवसली होती, हे त्यांच्या कवितेतून जाणवते. कदाचित त्यामुळेच असेल कॅन्सर झाल्यावर त्या गर्भगळीत झाल्या नाहीत. जगण्याचे सौंदर्य आणि त्यातली अर्थपूर्णता त्यांनी ताकदीने व्यक्त केली आणि मृत्यूचे चिंतनही तितक्याच ताकदीने व्यक्त केले पण त्यात निराशावाद नाही. पुन्हा नव्याने जगण्याच्या आशावादाचे पंख व्यक्त करताना त्यांच्यातले आत्मबलही सुजाण रसिकांना जाणविल्याशिवाय राहात नाही. हा त्यांचा अखेरचा कवितासंग्रह होता. यानंतर अरुणाताई नसतील पण त्यांची कविता आणि त्यांचा विचार प्रेरणा देत राहणारा आहे. विदर्भाच्या साहित्य सृष्टीत त्यांच्या जाण्याने एक सुन्नता आली आहे. (प्रतिनिधी)
...पण सारंकाही शांत झालंय आता
By admin | Updated: July 15, 2015 03:30 IST