नागपूर : आपले विचार व मूल्ये आत्मसात करून युरोपातील नागरिकांनी प्रगती केली. आपण मात्र आजही याचे महत्त्व समजू शकलो नाही. आपण केवळ आर्थिकच नाही तर, मानसिकदृष्ट्याही गरीब आहोत, अशी खंत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केली.व्यावसायिक विनीत मोहंता लिखित व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची प्रस्तावना लाभलेल्या ‘प्रुडेन्ट पंचेस’ या सचित्र चारोळीसंग्रहाचे रविवारी घई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक सीए राजेश लोया व सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे संचालक सीए मनीष नुवल प्रमुख अतिथी होते. कार्यक्रम वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे पार पडला.आपल्याकडील वेद, रामायण, महाभारत, गीता यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये मौलिक विचार आहेत. असे असतानाही आज आपल्या विचारांमध्ये प्रचंड रितेपण आहे. पूर्वजांच्या मान्यतांना काहीच महत्त्व उरले नाही. पूर्वी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणणे सर्वजण ऐकायचे. आज प्रत्येकाचा वेगळा विचार आहे. यातून वाद वाढले आहेत. समजून घेण्याची शक्ती कमी झाली आहे. बुद्धिवंत समाजाची क्षती झाली आहे असे घई यांनी सांगितले.लोया यांनी चारोळीसंग्रहावर भाष्य केले. लेखकाने जीवन जगताना हृदयाला भिडलेल्या गोष्टी पुस्तकात उतरविल्या आहेत. ही जीवनाची कथा आहे. लेखक व्यक्ती, समाज व निसर्गाशी जेवढा जुळतो तेवढाच परिपक्व होतो हे यातून दिसून येते असे मत त्यांनी व्यक्त केले.नुवल यांनी हे पुस्तक एक संपत्ती असल्याचे सांगून त्याचे हिंदीमध्ये भाषांतर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सीए कविता लोया यांनी संचालन केले तर, नीरजा मोहंता यांनी आभार मानले. अनिता लद्धड यांनी घई यांचा परिचय करून दिला. (प्रतिनिधी)असेही म्हणाले घई४लहान असताना आईच्या आग्रहामुळे पौराणिक कथा वाचत होतो. त्यातील भावार्थ समजून घेत होतो. त्यामुळे लिहायला शिकलो. याचे श्रेय आईला जाते.४जन्मभूमी नागपूर असल्यामुळे येथे येणे आनंददायक असते. मी बिशप कॉटन शाळेत शिकलो. येथे येऊन भाषण द्यावे लागेल, असे त्यावेळी वाटले नव्हते.४मी जीवनात फार संघर्ष केला आहे. परंतु संघर्षातही आनंदाने जगलो. संघर्षातून काही तरी नवीन शिकलो. जीवनातील अनुभवातून समजूतदार झालो.४मुलांना मौलिक विचार सांगणारे पुस्तके वाचायला द्या. त्यांना नेहमी प्रोत्साहन देत राहा. जीवनाचा सार समजल्यानंतर ते नक्कीच बुद्धिवंत होतील.४भारतात १० हजार कथा आहेत. यामुळे आपण इतर देशांपेक्षा महान आहोत. विद्यार्थ्यांनी या कथा चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे आणाव्यात.४अनेक मान्यवर उपस्थित कार्यक्रमात लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी आमदार नितीन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय आर्थिक व मानसिकदृष्ट्या गरीब
By admin | Updated: April 18, 2016 05:55 IST