निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत: एलआयसी व सोसायटीचे पैसे भरायला लावणे हा प्रकार पोलीस आयुक्त कार्यालयातील बाबूंना आणखी आराम आणि प्रत्यक्ष मैदानात गुन्हेगारांसोबत लढाई लढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘लोड’ वाढविणारा होय, अशी बोलकी प्रतिक्रिया सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली. एम.आय अजीज हे निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आहेत. ते सध्या निवृत्त पोलीस अधिकारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ‘प्रशासनाने वाढवला पोलिसांवरील ताण’ या मथळ्याचे वृत्त लोकमतने रविवारी प्रकाशित केले होते. यावर माजी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.अजीज म्हणाले की, पोलीस विभागात ‘मिनिस्टेरियल’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ अशा दोन प्रकारचा कर्मचारी वर्ग आहे. मिनिस्टेरियल स्टाफ हा वेतन काढणे, पीपीएफ, जीपीएफ आणि इतर बाबींची कपात करणे, लेखाजोखा ठेवणे एवढेच काम करतो. त्याची सेवाही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असते. पोलीस कर्मचारी हा २४ तास फिल्डमध्ये असतो. गुंडाना नियंत्रणात आणून लोकांना सुखाची झोप मिळवून देतो. प्रत्येक नागरिक हा जागरुक झाला आहे. त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. घाण्याच्या बैलासारखा तो राबत राहतो. कामाच्या ओझ्यामुळे त्याला स्वत:चा पगार किती , एरिअर्स वाढला काय, याचेही भान राहत नाही. घरी भाजी, इतर आवश्यक वस्तू घेऊन जाण्यासही तो विसरतो. कुटुंबाकडे लक्ष देण्याची सवडही त्याला मिळत नाही. ओव्हर बर्डन कामामुळे एलआयसी कार्यालयात जाऊन, रांगेत लागून प्रीमियम भरणे त्याला शक्य नाही. अशा वेळी निश्चित त्याची पॉलिसी लॅप्स होईल. सहकारी संस्थेचे पैसे भरणेही त्याला अशक्य होऊन संस्थेवरही परिणाम होईल. एक साधा व्यापारीही लेखाजोखा ठेवण्यासाठी दिवाणजी ठेवतो. हे या पोलीस जवानाला शक्य नाही. आठ तास सेवा देणाऱ्या बाबूंचे कामच मुळात लेखाजोखा ठेवणे आहे. या प्रकारामुळे पोलिसांवर आणखी बोझा लादून बाबूंना आणखी आराम दिला जात आहे, असेही ते म्हणाले. पोलीस पतसंस्थेचे हप्ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापले जावे आणि एलआयसीचे हप्ते संबंधितांच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे कापले जावे किंवा स्वत: एलआयसीचा कर्मचारी ताफा वसुलीच्या कामात गुंतवावा. पोलिसांवर कामाचा सतत बोजा वाढत आहे. त्यांना काही तरी दिलासा द्या, असे सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त रवींद्र कानफाडे म्हणाले. (प्रतिनिधी)तर वसुली कोण करेल? या प्रकाराने पतसंस्थेचे कर्ज हप्ते थकीत होतील. थकबाकीतच्या वसुलीच्या प्रश्न निर्माण होईल. पतसंस्थेवर गंभीर परिणाम होईल. चेक भरणे किंवा फॉर्म भरणे हा पोलीस कर्मचाऱ्यांच्या सवयीचा भाग नाही. अनेक चुका होतील. पोलिसांकडे वेळ नाही. आठ तास सेवा करणाऱ्या बाबूंकडेच हप्ते कपातीचे काम दिले पाहिजे, असे निवृत्त पोलीस अधिकारी असोसिएशनचे सचिव निवृत्त सहायक पोलीस उायुक्त रमेश मेहता म्हणाले.
हे तर बाबूंना आराम व पोलिसांचे लोड वाढविणे होय
By admin | Updated: July 13, 2015 02:30 IST