बारदान्याअभावी खरेदी बंद : तूर उत्पादकांचा जीव टांगणीला कळमेश्वर : एकीकडे, तुरीच्या उत्पादनात वाढ झाली असून, दुसरीकडे खुल्या बाजारातील तुरीचे भाव गडगडले. त्यामुळे शासनाने नाफेडच्या मध्यमातून तूर खरेदी करायला सुरुवात केली. त्यातच नाफेडने बारदाना (तुरी भरण्यासाठी आवश्यक असलेली पोती) नसल्याचे कारण पुढे करून तुरीची खरेदी बंद केली. त्यामुळे कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या शेकडो क्विंटल तूर पोत्यात भरून उघड्यावर पडल्या आहे. या प्रकारामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे. यावर्षी शासनाने नाफेडच्या माध्यमातून बहुतांश बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी केंद्र सुरू केले. त्यात कळमेश्वर बाजार समितीचाही समावेश आहे. या केंद्रावर हमीभावाप्रमाणे अर्थात प्रति क्विंटल ५०५० रुपये भावाने तुरीची खरेदी केली जात असल्याने तसेच खासगी व्यापारी यापेक्षा कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर नाफेडला विकणे पसंत केले. त्यामुळे या खरेदी केंद्रावर आवकही वाढली. त्यातच नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. नुकसान टाळण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांना तुरीची विकल्यास शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो तर, दुसरीकडे नाफेडच्या खरेदीची प्रतीक्षा केल्यास उघड्यावर ठेवलेल्या तुरीची नासाडी होते. अशा दुहेरी संकटात तालुक्यातील तूर उत्पादक सापडले आहेत.(प्रतिनिधी) एक महिन्यानंतरचा धनादेश हातात या केंद्रावर तूर विकल्यानंतर शेतकऱ्यांना रकमेचा पोस्ट डेटेड चेक दिला जातो. या चेकवर एक महिन्यानंतरची तारीख नमूद केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम किमान दीड महिन्यानंतर मिळणार आहे.
शेकडो पोती तूर उघड्यावर
By admin | Updated: April 2, 2017 02:37 IST