रेवराल : कार्यालयीन वेळेत जनतेच्या कामांना बगल देत रामटेक येथील रिसॉर्टमध्ये पार्टी करणे मौदा तालुक्यातील २५ ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या ४ अधिकाऱ्यांना भोवले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच मौदा येथील गटविकास अधिकारी दयाराम राठोड गुरुवारी अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी तालुक्यातील २५ ग्रामसेवक व पंचायत समितीच्या ४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. याबाबत संबंधितांना तीन दिवसात खुलासा सादर करावयाचा आहे. ग्रामसेवक व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ तील नियम ३ अन्वये आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार
मौदा तालुक्यातील ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामाला बगल देत बुधवारी रामटेक येथे पार्टी केल्याचे वृत्त गुरुवारी प्रकाशित झाले. यासंदर्भातील माहिती नेरला ग्रामपंचायतीचे सदस्य रोषण मेश्राम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला कळविली.
...तर एक दिवसाची पगार कपात
पूर्वपरवानगी न घेताना रामटेक येथे पार्टीला जाणाऱ्या ग्रामसेवकांचा एक दिवसाचा पगार कपात होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांच्या सेवापुस्तिकेत याबाबतची नोंद करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी दयाराम राठोड यांनी सांगितले.