जलालखेडा : माताेश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड व महिला बचत गट पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पिंपळगाव (राऊत) (ता. नरखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आराेग्य तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात गावातील २०० महिलांच्या आराेग्याची माेफत तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, पिंपळगावचे सरपंच चंद्रशेखर राऊत, माजी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी देशमुख, हरणे, ठाकरे व क्षेत्रकार्य ग्रुप मार्गदर्शक चव्हाण उपस्थित होते. यावेळी महिलांची रक्त, रक्तदाब, रक्त शर्करा यांसह आवश्यक तपासण्या करण्यात आल्या, शिवाय त्यांना आराेग्य व आजारांविषयी माहिती व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.पी. उमरगेकर, समुदाय आराेग्य अधिकारी डॉ.प्रतीक राऊत, डॉ.जाधव, आरोग्य सहायक दीपक सहारे, वैभवी शेंदरे यांनी सेवा प्रदान केली. यशस्वितेसाठी शेखर राऊत, गायत्री सर्याम, दीपाली सलामे, चित्रा सेग्रोल, अक्षय साबळे यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्य, अंगणवाडीसेविका व आशासेविकांनी सहकार्य केले.