नितीन गडकरी : श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सवनागपूर : जिथे अनुदान आणि शासकीय पैसा मिळतो तेथील काम योग्य पद्धतीने होत नाही. एकदा एका रुग्णालयात गेलो असता हे शासकीय रुग्णालय आहे की ‘पब्लिक टॉयलेट’ असा प्रश्न पडला, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णालयांचे वास्तव मांडले. सोबतचआयुर्वेदात गुणात्मक बदल करीत संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली. भारतीय वैद्यक समन्वय समितीद्वारा संचालित श्री आयुर्वेद महाविद्यालय व पक्वासा समन्वय रुग्णालयाचा सुवर्ण महोत्सव आणि रसऔषधीवरील चर्चसत्राचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे प्र-कुलगुरु डॉ. शेखर राजदेरकर, भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय, सहसचिव वैद्य वेदप्रकाश शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य व स्वर्ण जयंती महोत्सवाचे संयोजक वैद्य मनीषा कोठेकर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, होमिओपॅथी, आयुर्वेदपॅथीच्या ज्या डॉक्टरांना आपल्याच पॅथीवर विश्वास नाही, जे अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करतात, त्यांनी आपली ‘डिग्री’ सोडावी. प्रत्येक पॅथीचे एक वेगळे महत्त्व आहे. विदर्भात ७० ते ८० टक्के जंगल आहेत. यातील वनौषधी शोधून त्याचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतल्यास अनेकांना रोजगार मिळू शकतो. विशेषत: या भागातील १५ हजार युवकांना या माध्यमातून रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आयुर्वेदाची माहिती संस्कृत भाषेत आहे आणि आपल्याकडे संस्कृत भाषावाचकांची संख्या कमी आहे. त्यामुळे आयुर्वेदाला मर्यादा निर्माण होतात. त्या भाषेतील आयुर्वेदाच्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. आयुर्वेद जगभर पोहोचविण्यासाठी आणि त्याला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)रसशास्त्राला समजून घ्याप्र-कुलगुरु डॉ. राजदेरकर म्हणाले, आयुर्वेद सर्व वेदांची जननी आहे. वेद म्हणजे अभ्यास. परंतु अलीकडच्या काळात याचा अभ्यासच होत नसल्याचे दिसून येते. रसशास्त्राला समजून घेणे आवश्यक आहे. अॅलोपॅथीचा डॉक्टर असतानाही मला रसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, एवढे ते महत्त्वाचे आहे. आपल्या औषधांवर विश्वास ठेवा. रुग्णांना माणूस समजून उपचार करा. ‘बायोडाटा’ वाढविण्यासाठी संशोधन करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. स्वागतपर भाषण सुरेश शर्मा यांनी केले. त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसारखीच (एम्स) आयुर्वेदाच्या विकासासाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उद्बोधन प्राचार्य वैद्य मनिषा कोठेकर यांनी केले. सुरुवातीला रसऔषधीवरील राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक आयोजन समितीचे सचिव डॉ. रमण बेलगे यांनी केले. संचालन डॉ. मृत्युंजय शर्मा यांनी केले तर आभार वैद्य गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी मानले.
शासकीय रुग्णालये की ‘पब्लिक टॉयलेट’
By admin | Updated: October 10, 2015 02:56 IST