नागपूर विद्यापीठ : १५ ऐवजी ५ एकरमध्ये कॉलेज सुरू करण्याची तयारीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठातील ‘मॉडेल कॉलेज’वरून निर्माण झालेला वाद अजूनही शमलेला नाही. दोन्ही विद्यापीठांमधील वादात व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापही या कॉलेजसाठी जागा मिळू शकलेली नाही व आता कॉलेजच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करण्यात येऊ लागले आहेत. अशा स्थितीत ‘मॉडेल कॉलेज’ला नियमितपणे सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडून लवकरात लवकर हालचाली करण्याचे आश्वासन कुलगुरू अनुपकुमार यांनी दिले आहे. १५ ऐवजी ५ एकरातच ‘मॉडेल कॉलेज’ सुरू करण्याची विद्यापीठाची तयारी असून याकरिता प्रशासन गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.केंद्र शासनाच्या योजनेनुसार दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘मॉडेल कॉलेजह्ण संकल्पना राबविण्यात आली. त्यानुसार राज्यातील सात महाविद्यालयांपैकी गडचिरोली जिल्ह्यात असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ‘मॉडेल कॉलेजह्ण विद्यापीठाच्या लालफितशाही धोरणामुळे बंद पडण्याचा मार्गावर आहे. गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यावर त्यांनी उपकेंद्राच्या जागेवर हक्क सांगून कॉलेजचे कार्यालयही काढून टाकले. अद्यापही ‘मॉडेल कॉलेज’ला पर्यायी जागा मिळाली नसून भाड्याच्या इमारतीत कारभार सुरू आहे. दरम्यान या वादांमुळे कॉलेजला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत.नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. ‘मॉडेल कॉलेज’ कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर नियमितपणे सुरू व्हावे व याला कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी जोमाने प्रयत्न करण्याचे प्रशासनातर्फे आश्वासन देण्यात आले. सध्याच्या स्थितीत १५ एकर जागा सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जागांचा शोध घेण्यासंदर्भात पावले उचलून मिळेल त्या जागेत कॉलेज सुरू करण्याची विद्यापीठाची तयारी आहे व जिल्हाधिकाऱ्यांकडून ५ एकर जागा घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी यात स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)समितीचे काय झाले?गडचिरोली येथील मॉडेल कॉलेजसाठीच्या जागेचा शोध घेण्यासाठी विद्यापीठाने विशेष समिती नेमली होती. या समितीने गडचिरोलीचा दौरा केला होता. या समितीने एक जागा अंतिम केल्याची माहिती तत्कालिन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली होती. परंतु नंतर या जागेसंदर्भात पुढील कार्यवाही कुठल्या दिशेने झाली यासंदर्भात कुठलीही माहिती मिळाली नाही. अगदी समितीत असलेल्या सदस्यांना यासंदर्भात विद्यापीठाने काहीही कळविलेले नाही, असे एका सदस्याने सांगितले.
‘मॉडेल कॉलेज’ समोरील जागासंकट कायम
By admin | Updated: July 11, 2014 01:24 IST