ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.19- शाळेतील नवनिर्माणाधिन भिंती (पॅराफिट वॉल) च्या काही विटा कोसळल्याने पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. जखमी विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुरातील मेडिकलमध्ये भरती केले. ही घटना सावनेर येथील जवाहर कन्या विद्यालय परिसरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
साक्षी वाडबुधे, सानिया पठाण, कल्पना पाटील, रेणुका काळे, आशा ढवळे अशी जखमींची नावे आहे. या सर्व विद्यार्थिनी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर वर्गात जात होत्या. दरम्यान शाळा परिसरातील नवनिर्माणाधिन इमारतीच्या भिंतीच्या काही विटा पडल्या. त्या विटा विद्यार्थिनींना लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यामुळे शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी लगेच त्या विद्यार्थिनींना सावनेरातीलच शासकीय रुग्णालयात भरती केले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल)मध्ये हलविले. जखमींपैकी एक विद्यार्थिनी ही पाचवी तर उर्वरित चार या नववीच्या विद्यार्थिनी आहेत. जखमी सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.