सावनेरच्या जवाहर कन्या विद्यालयातील घटना : जखमींवर नागपुरात उपचार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शाळेच्या नवनिर्माणाधिन इमारतीच्या पॅराफिट वॉलच्या (भिंतीच्या) विटा पडल्याने पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. ही घटना सावनेरच्या जवाहर कन्या विद्यालयात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर लगेच जखमी विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालयात आणि तेथून लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविले. या प्रकारामुळे शाळा प्रशासनाविरोधात पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. कल्पना चंद्रकांत पाटील (१४), साक्षी प्रवीण वाडबुधे (१४), सानिया नदीम पठाण (१४), आशा चंद्रभान ढवळे (१३) आणि रेणुका महादेव काळे (१०) अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. यापैकी रेणुका ही पाचवीची विद्यार्थिनी असून उर्वरित नववीच्या विद्यार्थिनी आहेत. सावनेर बसस्थानकासमोर जवाहर कन्या विद्यालय असून शाळेचे सत्र दोन पाळीत चालते. सकाळी ७.३० ते ११.४५ पर्यंत पाचवी ते सातवी आणि दुपारी १२ ते ५.३० पर्यंत आठवी ते दहावीचे वर्ग भरतात. या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. दुसऱ्या माळ्यावर काम सुरू असताना तळ माळ्यावरील खोलीमध्ये वर्ग सुरू असतात, हे विशेष! सकाळी ११.४५ वाजता पहिल्या पाळीतील विद्यार्थिनींना सुटी होताच त्या बाहेर जात होत्या. तर दुसऱ्या सत्रातील विद्यार्थिनी शाळेत येण्याच्या घाईत होत्या. अशात दुसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या पॅराफिट वॉलच्या काही विटा खाली पडल्या. त्या विद्यार्थिनींच्या अंगावर पडल्याने पाचही विद्यार्थिनी जखमी झाल्या. ही घटना होताच विद्यार्थिनींसह शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लगेच सावनेरातीलच शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत बरेठिया यांनी प्रथमोपचार करून पाचही विद्याथिनींना नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पाचही विद्यार्थिनींना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भरती केले. या प्रकरणी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी केल्या सूचना शाळेत ही घटना घडताच मुख्याधिकारी संघमित्रा ढोके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाकरे, नगर परिषद उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी यांच्यासह लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. मुख्याधिकारी ढोके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शाळेच्या दिवशी बांधकाम करू नये, सुटीच्या दिवशीच ते करावे, जखमी विद्यार्थिनींना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात, उपचाराचा खर्च शाळा प्रशासनाने करावा, अशा सूचना शाळा व्यवस्थापनाला केला. यासोबतच त्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांशीही चर्चा केली. शाळा संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल शाळेत वर्ग सुरू असताना शाळा इमारतीचे बांधकाम केले जात होते. त्यातच सुरक्षिततेचा अभाव असल्याने त्यातूनच ही घटना घडली. याबाबत नदीमखान इब्राहिमखान पठाण (४५, रा. सावनेर) यांनी सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीवरून संस्थेचे सचिव, व्यवस्थापक, शाळेचे मुख्याध्यापक आणि बांधकाम कंत्राटदारांविरुद्ध भादंविच्या कलम २८८, ३३६, ३३७, ३३८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गायगोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नेरकर करीत आहे. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
शाळेची भिंत कोसळून पाच विद्यार्थिनी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:19 IST