भावना गवळी प्रतिवादी : वाशीम जिल्हाधिकार्यांची हजेरीनागपूर : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी प्रतिवादी असलेल्या मालेगाव येथील बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखानासंदर्भातील (प्लायवूड कारखाना) जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १६ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली आहे.गेल्या तारखेला न्यायालयाने वाशीम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांना अवमानना नोटीस बजावून प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, कुळकर्णी यांनी न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने कुळकर्णी यांनी दिलेल्या माहितीवर समाधान व्यक्त करून याचिकेवर अंतिम सुनावणी निश्चित केली. समाजसेवक सुभाष देवडे यांनी कारखान्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दाखल केली आहे. भावना गवळी यांचे स्वीय सहायक अशोक गांडुळे (महाजन) भागीदार असलेल्या भावना अँग्रोटेक कंपनीने हा कारखाना केवळ ७ कोटी रुपयांत खरेदी केला आहे.यामुळे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या सदस्य शेतकर्यांची फसवणूक झाली आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. प्रकरणाची विशेष पथक किंवा उच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी, अशी त्यांची विनंती आहे.(प्रतिनिधी)
बालाजी कारखानाप्रकरणी अंतिम सुनावणी निश्चित
By admin | Updated: May 8, 2014 02:51 IST