राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शासनाच्या आदेशानुसार रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रावर तुरीची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार खरेदी केली जाते. या केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी ‘ऑनलाईन’ नाेंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, खुल्या बाजारात तुरीला किमान आधारभूत किमतीपेक्षा प्रति क्विंटल ५०० ते ८०० रुपये दर अधिक मिळत असल्याने, शेतकऱ्यांनी यावर्षी शासकीय तूर खरेदी केंद्राकडे सध्या तरी पाठ फिरविली आहे.
चालू हंगामासाठी केंद्र शासनाने तुरीला प्रति क्विंटल ६,००० रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. त्या अनुषंगाने रामटेक शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, त्यापूर्वी तुरीच्या विक्रीसाठी ‘ऑनलाईन’ नाेंदणी प्रक्रियाही सुरू करण्यात आली. परंतु, एकाही शेतकऱ्याने तुरीच्या विक्रीसाठी नाेंदणी केली नाही, अशी माहिती रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हनुमंता महाजन यांनी दिली.
रामटेक तालुक्यात तूर विक्रीला सुरुवात झाली असून, व्यापाऱ्यांनी खरेदीला प्रारंभ केला आहे. तुरीची आधारभूत किंमत ६,००० रुपये प्रति क्विंटल असून, शासकीय खरेदी केंद्रावर याच दराने तुरीची खरेदी केली जाणार आहे. व्यापारी मात्र याच तुरी प्रति क्विंटल ६,५०० ते ६,८०० रुपये दराने खरेदी करीत आहेत. सध्या प्रति क्विंटल ५०० ते ८०० रुपये अधिक मिळत असल्याने, व्यापाऱ्यांना तुरी विकण्यास प्राधान्य देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, तुरीच्या बाजारात तेजी येणार असल्याची तसेच तुरीचे दर वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्तींसह दाल मिल मालक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
...
सरसकट खरेदी
शासकीय केंद्रावर तुरीची खरेदी ही ‘ग्रेडेशन’नुसार केली जाते. त्यासाठी माेजमापापूर्वी शेतकऱ्यांकडील तुरीला चाळणी लावून गाळली जाते. प्रसंगी तूर नाकारलीदेखील जाते. व्यापारी मात्र तुरीला चाळणी न लावता सरसकट खरेदी करीत असून, व्यापारी काेणत्याही प्रतिची तूर नाकारत नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मागील वर्षी तुरीचे दर प्रति क्विंटल ४,८०० ते ५,००० रुपये प्रति क्विंटल हाेते. यावर्षी बाजारात तेजी असल्याने प्रति क्विंटल किमाल १,५०० रुपये अधिक मिळत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
...
समाधानकारक उत्पादन
चालू खरीप हंगामात रामटेक तालुक्यामध्ये पाच हजार हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाची पेरणी करण्यात आली हाेती. सुरुवातीला समाधानकारक पाऊस बरसल्याने तुरीच्या पिकाची अवस्था चांगली हाेती. उशिरा पेरणी केलेल्या तुरीच्या पिकावर काही प्रमाणात राेग व किडींचा प्रादुर्भाव झाला हाेता. मात्र, राेग व कीड वेळीच नियंत्रणात आल्याने शेतकऱ्यांना फारसा फटका बसला नाही. शिवाय, अनुकूल वातावरणामुळे तालुक्यात तुरीचे उत्पादनही समाधानकारक झाले आहे. दुसरीकडे, शासनाने किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दराने खरेदी करायला हवी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.