लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्टमध्ये कन्हान व पेंच नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक गुरुवारी (दि. २४) साेनेगाव (राजा), ता. कामठी, सिंगारदीप, सालई, माहुली, ता. पारशिवनी आणि माथनी, ता. माैदा येथील पूल व पाणीपुरवठा याेजनेच्या नुकसानीची पाहणी केली. साेनेगाव (राजा) येथील पूरग्रस्तांनी पथकाला घेराव करीत गावाच्या पुनर्वसनाची मागणी रेटून धरली हाेती. या पथकाने पेंच नदीवरील सालई-माहुली दरम्यानच्या तुटलेल्या पुलाची तसेच माथनी शिवारातील कन्हान नदीवरील पूल व माैदा शहराच्या पाणीपुरवठा याेजनेची पाहणी केली.
मध्य प्रदेशातील संततधार पावसामुळे कन्हान व चाैराई धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पेंच नदीला पूर आला हाेता. पेंच नदी कन्हान नदीत विलीन हाेत असल्याने या पुरामुळे सावनेर, पारशिवनी, कामठी, माैदा व कुही तालुक्यात माेठे नुकसान झाले हाेते. साेनेगाव (राजा) गावाला पुराने चहुबाजूंनी वेढले हाेते. यात येथील ६४ नागरिकांच्या घरांची पडझड झाली हाेती तर ५४ नागरिकांच्या घरांमधील साहित्याचे नुकसान झाले हाेते. शेतातांमधील पिके वाहून गेली हाेती. घरांचीही माेठ्या प्रमाणात पडझड झाली हाेती.
हे पथक सकाळी साेनेगाव (राजा) येथे दाखल हाेताच पूरग्रस्तांनी अधिकाऱ्यांना घेराव करीत त्यांच्या विविधा समस्या अधिकाऱ्यांसमक्ष मांडल्या. वारंवार पुराचा फटका बसत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली हाेती. घरांचे बांधकाम करण्यासाठी पट्टे व निधी द्यावा, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली.
अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करीत त्यांना शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईबाबत चाैकशी केली. यात काहींनी नुकसान भरपाई मिळाल्याचे तर काहींनी अद्यापही मिळाली नसल्यााचे सांगितले. अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या.
या पथकाने पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली दरम्यान असलेल्या पेंच नदीवरील वाहून गेलेल्या पुलाची सिंगारदीप शिवारातील खरडून गेलेल्या शेताची तसेच माैदा तालुक्यातील माथनी शिवारातील कन्हान नदीवरील पूल व माैदा शहराच्या पाणीपुरवठा याेजनेची पाहणी केली. त्यानंतर दुपारी पथक भंडारा जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले. या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार घंटा, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य अभियंता महेंद्र सहारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांचा समावेश हाेता. यावेळी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, दिनेश निंबाळकर, मुख्य अभियंता तुषार व्यास, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, मौद्याच्या मुख्याधिकारी कोमल कराळे यांच्यासह साेनेगाव (राजा) ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पूल व पाणीपुरवठा याेजनेची पाहणी
पुरात पेंच नदीवरील सालई-माहुली दरम्यानचा नव्याने बांधलेला पूल वाहून गेला. पथकाने या पुलासह कन्हान नदीवरील माथनी शिवारातील ब्रिटिशकालीन पुलाच्या नुकसानीची तसेच माैदा शहराच्या कन्हान नदीवरील पाणीपुरवठा याेजनेच्या नुकसानीची पाहणी केली. पाणीपुरवठा क्षतिग्रस्त झाल्याने माैदा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात ही समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता बळावली आहे. या पथकाने या तिन्ही ठिकाणी स्थानिकांशी चर्चा केली नाही. विशेष म्हणजे, तालुका प्रशासनाने पथक येणार असल्याची माहिती स्थानिकांना दिली नव्हती, अशी माहिती नागरिकांनी दिली.
२३ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान
या पुरामुळे पाच तालुक्यातील एकूण २२,९९४ हेक्टरमधील खरीप पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. यात माैदा तालुक्यातील ६,८०० हेक्टर, सावनेर तालुक्यातील ५,१९४ हेक्टर, कुही तालुक्यातील ५,१०० हेक्टर, पारशिवनी तालुक्यातील ३,२०० हेक्टर व कामठी तालुक्यातील २,७०० हेक्टरमधील विविध पिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. यातील काही नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली असून, काहींना मात्र आजही प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यातील ४८८ गावांना बसला होता फटका
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नागपूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील ४८८ गावे बाधित झाली होती. तर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यातील ४५,७२४ शेतकऱ्यांसह एकूण ९०,८५८ नागरिक यामुळे बाधित झाले होते. २२,९९४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.
शुक्रवारी चंद्रपूर, भंडाऱ्याची पाहणी
केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करेल. यानंतर शनिवारी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात बैठक होईल.