नागपूर : शहरापेक्षा ग्रामीण भागात आरोग्य सेवा करणे आव्हानात्मक असते. अपुऱ्या सोयीसुविधा व साधनसामग्रीच्या अभावात रुग्णसेवा करणे कसरतच असते. कोरोना महामारीमध्ये ही परिस्थिती अधिकच ठळकपणे जाणवली. पण या स्थितीत डॉक्टरांसह परिचारिका समोर राहून लढा देत आहेत. अशा अनेक कोरोना योद्धांपैकीच एक म्हणजे वर्षा पाटील.
भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ सामान्य रुग्णालयात सेवारत वर्षा यांनी ही परिस्थिती अनुभवली व रुग्णसेवा करताना स्वत: या संकटाचा सामना केला आहे. वर्षा या गेल्या सात-आठ वर्षांपासून नर्स म्हणून सेवा देत आहेत. पण अशी परिस्थिती कधीही न अनुभवल्याचे सांगतात. शहरापेक्षा ग्रामीण भागात अनेक अडचणी येतात. लोकांमधील भीती व गैरसमजांचा सामना करणे एक आव्हान असते. रुग्णसंख्या वाढली तसा तणावही वाढला. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा रोषही सहन करावा लागत होता. मात्र याही परिस्थितीत अनेक परिचारिकांनी आपले कर्तव्य बजावल्याचे वर्षा यांनी सांगितले. कोरोना चाचणीबाबत लोकांमधील भीती आणि गैरसमज दूर करणे, त्यांची चाचणी करणे, संक्रमित रुग्णांची व घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांनाही सेवा देण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले. शिवाय लसीकरणासाठी लोकांना प्रेरित करण्याचे कामही त्यांनी समुपदेशनाद्वारे केले व आताही करीत आहेत.
या काळात कुटुंबाची गैरसोय त्यांनाही सहन करावी लागली. त्यांना अनेकदा पती, आठ वर्षाची मुलगी व पाच वर्षाच्या मुलापासून काहीसे वेगळे राहावे लागले. दरम्यान संपूर्ण कुटुंबावर काेराेनाचे संकट ओढवले. त्यांच्यासह पती, मुलगी कोरोना संक्रमित झाल्या. एवढेच नाही तर कोरोनामुळे आरोग्य सेवक म्हणून काम करणारा त्यांचा स्वत:चा लहान भाऊही त्यांनी गमावला. अशा अनेक जीवघेण्या परिस्थितीचा सामना करतानाही कर्तव्यभावना कमी पडू दिली नाही. आता त्या पुन्हा त्यांच्या कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत, दहशतीत वावरणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी.