लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखेरच्या श्वासापर्यंत, गरीबांच्या वेदनेचा आणि सामाजिक जाणीवेचा हुंकार झालेले आंबेडकरी व बौद्ध चळवळीतील ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागाचे माजी विभागप्रमुख कर्करोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे (७२) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार आहे. डॉ. कृष्णा कांबळे हे सामाजिक जाणिवेचे डॉक्टर म्हणून परिचित होते. मेडिकलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक वर्षे मेडिकलमध्ये सेवा दिली. त्यांच्या जाण्याने तथागताची समतेची चळवळ आणि माणूसपण जपणारा प्रत्येक व्यक्ती पोरका झाला आहे.
मेडिकलमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांचे आधारस्तंभ असणारे, भामरागडपासून ते मेळघाटातील गरीब कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी झटणारे आणि शासकीय सेवानिवृत्तीनंतरही केवळ गरिबांची सेवा करता यावी म्हणून कुठल्याही खासगी दवाखान्यात न जाता मेडिकलमध्येच सेवा देणारे गरिबांचे डॉक्टर कृष्णा कांबळे अखेर कोरोनामुळे कायमचे निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मेडिकलमध्येच तब्बल १२ वर्षे सेवा दिली. यासोबतच ते आंबेडकरी चळवळीतही सक्रिय होते. विविध सामाजिक आंदोलनात त्यांना सक्रिय सहभाग राहायचा. गरिबांसाठी शेवटपर्यंत झटणारे गरिबांचे डॉक्टर कृष्णा कांबळे अखेर शुक्रवारी कोरोनामुळे कायमचे निवृत्त झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी व आप्तपरिवार आहे.
मेडिकलच्या कर्करोग विभागात कार्यरत असताना भामरागडपासून ते मेळघाटातील गरीब कॅन्सरग्रस्तांसाठी ते देवदूतच होते. गरीब कॅन्सरग्रस्तांसाठी दानशुरांना मदतीचे आवाहन ते करायचे. ‘शिकवणे हे माझे पॅशन आहे’ असं ते नेहमीच म्हणायचे. २००७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर बाहेर गलेलठ्ठ पगार देणाऱ्या नोकरीच्या संधी असतानाही पैशांच्या मागे न धावता मेडिकलमध्येच ते रमले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे २०११ला रेडिओथेरपी ॲण्ड अन्कॉलॉजी हा विभाग मेडिकलमध्ये सुरू झाला. आंबेडकरी चळवळ व बौद्ध धम्म कार्यात ते सक्रिय होते. मागील काही वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त नागरी जयंती साजरी केली जाते. या समितीचे ते माजी अध्यक्षही होते. राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव म्हणून त्यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ऑनलाईन पदभारही बाबासाहेबांच्या खंड प्रकाशनाच्या दृष्टीने कामाला सुरुवातही केली होती. नागपुरातील शासकीय मुद्रणालयात जावून त्यांनी अनेक ग्रंथही पडताळून पाहिले होते. खंड प्रकाशनाच्या दृष्टीने नियोजनही केले होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते. ते काही दिवसांपासून मेडिकलमध्ये भरती होते. अखेर प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी ३.५०च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील आाणखी एक तारा कायमचा निर्वतला. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळच नव्हे तर सर्व समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
आंबेडकरी साहित्य आणि दलित चळवळीतील दुवा निखळला
आंबेडकरी साहित्य आणि दलित चळवळीतील दुवा निखळला डॉ. कृष्णा कांबळे यांच्या निर्वाणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि दलित चळवळीतील एका भक्कम दुवा निखळला. राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे डॉ. कृष्णा कांबळे सचिव होते. या काळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशित करण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यांच्या प्रयत्नातून नुकतेच जनताह खंडाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी कटिबद्ध असताना काळाने आकस्मिकपणे घाला घातल्याने आंबेडकरी साहित्य चळवळीची अपरिमित हानी झाली आहे.
नितीन राऊत, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री
अत्यंत दु:खद घटना
डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव, कर्करोगाचे तज्ज्ञ डॉक्टर, आंबेडकर विचारांचे अभ्यासक व जेष्ठ समाज कार्यकर्ते डॉ. कृष्णा कांबळे यांचे कोरोनामुळे झालेले निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार व केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य