मान्यवरांचे मत : विनोबा विचार केंद्रात चर्चासत्राचे आयोजननागपूर : मागील २० वर्षात वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढून पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले. ऋतुचक्र बदलून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होऊन ही चर्चा देशपातळीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.विदर्भ वनाधिकार संघटना, प्रदूषणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संघटना अणि कष्टकरी जन आंदोलनाच्यावतीने अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात ‘कोळसा, ऊर्जा आणि भारत देशातील वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कष्टकरी जन आंदोलनाचे नेते विलास भोंगाडे होते. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणाचे अभ्यासक सौमित्र घोष, सौम्या दत्ता, बँक इन्फॉर्मेशन सेंटरचे राजेश कुमार, डॉ. योगेश दुधपचारे उपस्थित होते. यावेळी बोलताना सौम्या दत्ता म्हणाले, मागील २० वर्षांपासून वीज प्रकल्पात कोळशाचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. देशभरात ७० ते ८० टक्के लोक विस्थापित झाले. यात ५० टक्के आदिवासींचा समावेश आहे. शासनाने २०११ पर्यंत २ लाख मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामुळे खदानी वाढल्या. जमीन आणि पाण्याचा वापर वाढला. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावल्याची माहिती त्यांनी दिली. सौमित्र घोष म्हणाले, २० वर्षात औद्योगिक क्रांती आणि वीज प्रकल्पांमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढून त्याचा वातावरणावर विपरीत परिणाम झाला. ऋतुचक्र बदलल्यामुळे शेतकरी, आदिवासी, लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. कार्बन डाय आॅक्साईडच्या उत्सर्जनामुळे कोरडा, ओला दुष्काळ निर्माण होऊन मानवी जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागले. या बदलांवर व्यापक चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या पातळीवर चर्चा होऊन ही चर्चा वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्याची गरज आहे. पॅरिसमध्ये डिसेंबर २०१५ मध्ये होणाऱ्या परिषदेत भारताच्या भूमिकेत स्थानिकांचे मत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चासत्रात डॉ. योगेश दुधपचारे, राजेश कुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रवीण मोते यांनी केले. आभार एकनाथ गजभिये यांनी मानले. यशस्वितेसाठी निशांत माटे, प्रेम शामकुवर यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात वणी, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
ग्रामसभेत व्हावी पर्यावरणाबद्दल चर्चा
By admin | Updated: October 11, 2015 03:19 IST