जबरी चोरी, लुटमार सुरूच : तरुणाला मारहाण करून लुटलेनागपूर : धंतोली ठाण्याच्या हद्दीतच बुधवारी रात्री एका तरुण व्यापाऱ्याला लुटारूंनी मारहाण करून त्याच्याजवळचे २० हजार तसेच मोबाईल हिसकावून नेले तर, या घटनेनंतर धंतोली आणि अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत लुटारूंनी दोन महिलांचे दागिने हिसकावून नेले. अवघ्या अर्धा तासाच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्यरेल्वेत कार्यरत अनिमेश बालाराम सोनी (वय ४९) हे पत्नी श्रध्दा सोनी यांच्यासोबत बुधवारी रात्री ८.४५ च्या सुमारास सुरेंद्रनगरातून दुचाकीने अजनीतील आपल्या घरी जात होते. देवनगर चौक ते अजनी चौकादरम्यान पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी श्रध्दा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. सोनी यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या घटनेच्या १० ते १५ मिनिटानंतर अमरावती मार्गावरील रविनगर चौकाजवळ लुटारूंनी सुजाता मिलिंद पेंडसे (वय ४०, रा़ भरतनगर, अमरावती रोड, नागपूर) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. सुजाता पतीच्या दुचाकीवरून जात होत्या तर आरोपी पल्सरवर होते. या दोन्ही घटनातील साम्य आणि वेळ बघता आरोपी एकच असावे, असा संशय आहे. अंबाझरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
धंतोली आणि अंबाझरीत चेनस्रॅचिंग
By admin | Updated: June 27, 2014 00:38 IST