लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील पांढरपेशांची वस्ती अशी ओळख असलेल्या प्रतापनगरात कुत्र्याच्या एका निष्पाप पिलाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सैतानालादेखील मान खाली घालायला लावणारा हा प्रकार असून नागरिकांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर प्राणिप्रेमींमध्ये संतापाची भावना असून पोलिसांतदेखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशन’च्या संस्थापिका स्मिता मिरे या गुरुवारी सकाळी त्यांच्या श्वानाला फिरविण्यासाठी गेल्या होत्या. प्रतापनगरातील गणेश कॉलनीतील मैदानाजवळ त्यांना काहीतरी जाळल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता चक्क दीड ते दोन महिन्याचे कुत्र्याचे पिलू जाळले होते. त्यांनी जवळपास विचारणा केली असता हा प्रकार कधी झाला व कुणी केला याबाबत कुणालाही काहीच कल्पना नव्हती. मिरे यांनी त्यानंतर थेट राणाप्रतापनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात भादंविच्या कलम २८९, कलम ४२८ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१५ दिवसांतील सहावी घटना
मागील १५ दिवसांत कुत्र्यांना क्रूरतेने मारल्याची ही सहावी घटना आहे. एका कुत्र्याला विष देऊन मारण्यात आले व अज्ञातांनी गणेश कॉलनीतच त्याचे शव आणून टाकले होते. तर इंदोरा येथे एका पिलाच्या पाठीवर पेव्हर ब्लॉकने प्रहार करून त्याला ठार करण्यात आले. गणेश कॉलनीत याअगोदर जवळपासच्या भागातील काही लोकांनी पोत्यात भरून कुत्र्याची पिले फेकली होती.
प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
संबंधित पिलू प्रतापनगरातील नसून बाहेरून आणले गेल्याची शक्यता स्मिता मिरे यांनी वर्तविली. मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या भागातील ४० हून अधिक कुत्र्यांची आम्ही नसबंदी केली. कुत्र्यांना अशाप्रकारे अमानवीय पद्धतीने मारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. कुत्रेदेखील समाजाचा घटक असल्याची बाब लोक मान्य का करत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.