नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. प्रत्येक गावातील घराघरात रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागात आपत्कालीन उपचाराची सोय नाही. शहरातील रुग्णालयात जागा नाही. औषधांचा तुटवडा, मनुष्यबळाचा अभाव यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण घरीच मरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांची अंत्ययात्राही निघत आहे.
कोरोनाचे ग्रामीण भागातील चित्र अतिशय भयावह आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना होम क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. व्हिटॅमिनच्या गोळ्यांसोबत कोरोनाचे रुग्ण लढत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत. हे सेंटरही हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही सेंटरमध्ये ऑक्सिजनची सोय आहे, तर मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे. जिल्हा परिषदेने डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेंडन्ट या पदांसाठी जाहिरातील दिल्या आहेत. पण, कर्मचारी मिळत नसल्याची स्थिती आहे. एमबीबीएस डॉक्टर सोडाच, बीएएमएस डॉक्टरसुद्धा आरोग्य विभागाला मिळत नाही. आरोग्याची अख्खी यंत्रणा वाऱ्यावर आहे. शहरात रुग्णाला पाठविल्यास बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरात बसूनच उपचार करावा लागत आहे.
- ग्रामीणच्या आरोग्य व्यवस्थेवर शहरातील यंत्रणा मॉनिटरिंग करीत आहे. मॉनिटरिंग करणाऱ्या यंत्रणेतील अधिकारीही सक्षम नाही. बैठकांच्या नावाने अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत. परिस्थिती इतकी बिकट झाली की, एका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने काम भागणार नाही. डॉ. योगेंद्र सवईसारख्या सक्षम अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरविण्याची गरज आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे की, डॉ. सवईकडे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी सोपवावी.
व्यंकट कारेमोरे, गटनेता, जि.प.
- ग्रामीण भागातील आहे ती यंत्रणा कामे करून थकलेली आहे. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालयाचा अर्धा स्टाफ क्वारंटाईन आहे. घराघरांत पोहोचणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.
- सतीश डोंगरे, जि.प. सदस्य
- शहरासारखीच गंभीर परिस्थिती आज जिल्ह्याची झाली आहे. आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या हाताबाहेर परिस्थिती गेली आहे. गावच्या गाव पॉझिटिव्ह निघत आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या भरवशावर गाव सोडले आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीणकडे स्वत:हून लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा प्रेतांचे खच लागल्याशिवाय राहणार नाही.
- वृंदा नागपुरे, जि.प. सदस्य