मनपाची कारवाई : गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेच्या लढ्याला यश नागपूर : गांधीसागर परिसरात झुलेलाल ट्रस्टतर्फे अनधिकृतरीत्या करण्यात येत असलेले बांधकाम बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तोडण्यास सुरुवात केली. गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेने यासाठी लढा उभारला होता. सोबतच ‘लोकमत’ने पर्यावरण संवर्धनासाठी या लढ्याला पाठबळ दिले होते. त्या लढ्याला शेवटी यश आले.गांधीसागर परिसरात झुलेलाल ट्रस्टतर्फे यात्री निवास उभारण्याचा प्रस्ताव होता. ही जागा नझुलची होती. मात्र, याची कुठलीही लीज ट्रस्टकडे नव्हती. त्यानंतरही येथे अनधिकृतरीत्या तळमजल्याचे बांधकाम करण्यात आले होते. गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर व पर्यावरण प्रेमींनी या विरोधात झोनचे सहायक आयुक्त जयदेव यांच्याकडे नंतर आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे तक्रार केली होती. या अतिक्रमणाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. हे वृत्त वाचून नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी या गांधीसागरची पाहणी करताना या बांधकामाची पाहणी केली. या वेळी आयुक्त वर्धने यांनी संबंधित बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेचे पथक बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास कारवाईसाठी पोहचले. बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली तेव्हा काही वेळ तणाव निर्माण झाला. काही बांधकाम तोडण्यात आले. शेवटी झुलेलाल ट्रस्टने आपण स्वत:हून सात दिवसात अतिक्रमण काढून घेऊ, असे शपथपत्र दिल्यानंतर कारवाई थांबविण्यात आली.(प्रतिनिधी)
झुलेलाल ट्रस्टचे बांधकाम तोडले
By admin | Updated: July 10, 2014 00:56 IST