लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी आंदोलनामागे मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याची बाब उघड झाली आहे. वेगवेगळ्या देशांतील नेत्यांना हाताशी धरून हा प्रकार सुरू आहे. काही लोक शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. मात्र शिवसेनेने असे प्रकार करण्याऐवजी राज्यात इंधनावरील कर कमी केले पाहिजेत. वीजबिलाबाबतदेखील सरकारने जनतेची दिशाभूल केली. राज्यात मोगलाई आल्याचे चित्र आहे. जोपर्यंत सरकार दिलासा देत नाही, तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्वावरून चिमटा काढला. केवळ भाषणातून बोलून चालत नाही, तर हिंदुत्व हे जगावे लागते. शिवसेनेने हिंदुत्व का सोडले याचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
अवैध मद्यविक्रीला सरकारचाच आशीर्वाद
चंद्रपुरात दारूबंदी लागू करण्यात आली होती. मात्र महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर तेथील अवस्था वाईट झाली आहे. सर्रासपणे अवैध मद्यविक्री सुरू आहे. दारूबंदी असलेल्या ठिकाणी तर नियोजितपणे असे प्रकार होत आहे. दारू आणि गुटख्याच्या अवैध विक्रीला सरकारचाच आशीर्वाद असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
एल्गार परिषदेबाबत सरकारची बोटचेपी भूमिका
एल्गार परिषदेतून सामाजिक सौहार्द धोक्यात येणारी वक्तव्ये केली जातील हे माहीत असूनदेखील त्याला शासनाने परवानगी दिली. सरकार त्यांना पाठीशी घालत असून, बोटचेपी भूमिका घेतली आहे. आम्ही आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले, असेदेखील फडणवीस म्हणाले.