नागपूर : नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठय़ाची स्थिती राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत उत्तम आहे. नागपूर विभागातील एकूण ३६६ प्रकल्पांत ५ मे रोजी ४४ टक्के जलसाठा होता. राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत हा सर्वाधिक आहे.जलसंपदा विभागाने संपूर्ण राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातील जलस्तर जाहीर केला आहे. नागपूर विभागातील प्रकल्पाचा जलस्तर अव्वल आहे. नागपूर विभागात मोठे, मध्यम आणि लघु मिळून एकूण प्रकल्पांची संख्या ही ३६६ आहे. त्यातील प्रकल्पीय क्षमता ३८९१ द.ल.घ.मी इतकी असून ५ मे रोजी धरणात १७२९ द.ल.घ.मी (४४ टक्के) पाणीसाठा होता. मागील आठवड्याच्या तुलनेत तो २ टक्के कमी असला तरी मे २0१३ च्या तुलनेत १0 टक्के तर २0१२ च्या तुलनेत २0 टक्के अधिक आहे.दुसरा क्रमांक अमरावती विभागाचा आहे. या भागातील ३७९ प्रकल्पांत ३९ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक), कोकण विभागातील १५८ प्रकल्पांमध्ये ३६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमी), नाशिक विभागातील ३५0 प्रकल्पांमध्ये २९ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक), मराठवाड्यातील ८0४ प्रकल्पांमध्ये २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत २0 टक्के अधिक), पुणे विभागातील ३६८ प्रकल्पांमध्ये २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के कमी) पाणीसाठा आहे. राज्यातील एकूण २४२५ प्रकल्पांमध्ये ३१ टक्के पाणी आहे. (गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे.)नागपूर विभागातील १६ मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५१ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक) पाणी आहे. पेंच प्रकल्पात ५४ टक्के, रामटेक (सूर) प्रकल्पात ६१ टक्के, नांदमध्ये २५ तर वेणामध्ये २७ टक्के पाणी आहे. विभागातील ४0 मध्यम प्रकल्पांत २५ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १0 टक्के अधिक) आणि ३१0 लघु प्रकल्पांत २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के अधिक) पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)
विभागातील जलसाठय़ाची स्थिती उत्तम
By admin | Updated: May 8, 2014 02:40 IST