मान्यवरांचे मत : ‘विकास : नेमका कोणाचा, कसा व किती?’ यावर चर्चासत्रनागपूर : विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचा विकास व्हायला हवा होता त्यांचा झाला नाही. विकासाच्या प्रकल्पांमुळे अनेक जण रस्त्यावर येऊन भूमिहीन, बेरोजगार झाले. देशात राबविलेले विकासाचे मॉडेल्सही कमकुवत ठरले. त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर विकासाकडे सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक दृष्टिकोनातून पाहून विकासाची संकल्पना सुस्पष्ट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि प्रगतिशील लेखक संघातर्फे वाङ्मय विचार पर्व या उपक्रम मालिकेत ‘विकास : नेमका कोणाचा, कसा व किती?’ या चर्चासत्राचे आयोजन बजाजनगरातील कस्तुरबा भवनात करण्यात आले. चर्चासत्रात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे म्हणाले, बॅनर तयार करणारे, बांधकाम क्षेत्रातील मजुरांची संख्या कमी होऊन काम मिळत नसल्याने ठिय्यावर मजूरही येत नाहीत. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या न मिळाल्याने अनेक परिवार विनाशाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, विकासात सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्रीय तथ्य तपासण्याची गरज आहे. क्रमबद्ध विकास तळागाळापर्यंत पोहोचतो. यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. मात्र भारतात यावर प्रयत्न कमी पडले. जपानने क्रमबद्ध विकास करून प्रगती साधल्याचे सांगून त्यांनी विविध विकासाच्या मॉडेल्सची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित म्हणाले, व्यवस्थेविषयी सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे. व्यवस्थेतील लोक सर्वांगीण विकास रोखून धरतात. सत्तेशी जुळवून घेणाऱ्यांचा विकास होतो. तळागाळापर्यंत विकास पोहोचविणारी यंत्रणा भ्रष्ट असून, वर्तमानकाळातील परिस्थिती पाहून विकासाची व्याख्या करण्याची गरज आहे. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सगळीकडे बेबंद भांडवलशाही उरली असून, तंत्रज्ञानाला विरोध न करता सामूहिक विकास साधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी संस्कृतीचा परिणाम विकासावर होत असल्यामुळे संस्कृती जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. सुरेश खैरनार यांनी पुनर्वसनासाठी आवाज उचलणाऱ्या चळवळी संपत असल्याची खंत व्यक्त करून, कायद्याच्या भरवशावर नक्षलवाद संपविणे कठीण असल्याचे सांगितले. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी तथाकथित विकासाच्या विरोधातील प्रश्न मांडण्याची लोकशाहीतील जागा हरवल्याचे मत व्यक्त केले. संचालन अजेय गंपावार यांनी केले. (प्रतिनिधी)
विकासाची संकल्पना सुस्पष्ट व्हावी
By admin | Updated: July 6, 2014 00:51 IST