उमरेड : संचारबंदी असतानाही त्याचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाबाधितांच्या संख्येत सारखी वाढ होत आहे. त्यामुळे १८ ते २५ एप्रिलपर्यंत उमरेड येथे कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय उमरेड तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती आणि नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयासाठी किराणा व्यापारी असोसिएशन, भाजीपाला विक्रेते तसेच कृषिसेवा केंद्राच्यावतीनेही पुढाकार घेण्यात आला. संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी दिले. याप्रसंगी आ. राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष गंगाधर फलके, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रमोद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक एस.एम. खानम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शहरामध्ये नियमावलीचे पालन नागरिक करीत नाहीत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे नियोजनसुद्धा गडबडले आहे. यामुळे आता संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. किराणा व्यापारी, भाजीपाला विक्रेते आणि कृषिसेवा केंद्र संचालकसुद्धा यासाठी तयार आहेत. तेव्हा तातडीने बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. शिवाय अतिरिक्त कोविड सेंटर सुरू करून नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सतीश चौधरी, उमेश हटवार, सुरेश चिचमलकर, डॉ. मुकेश मुदगल, कृषी केंद्र संचालक संजय मुंडले, राहुल मने, पंकज फटींग, गोविंद मुंधडा, संतोष महाजन आदींनी केली. आ. राजू पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया यांनीही कठोर पाऊल उचलण्याची गरज असून सोबतच आरोग्य सेवेत सुधारणा महत्त्वाची असल्याचेही मत व्यक्त केले.
अंत्यविधीसाठी काळजी घ्या
कोरोनामुळे दररोज अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अत्यंसंस्कारासाठीसुद्धा कुणी पुढे येत नाहीत. या कारणामुळे संबंधित कुटुंबीय कमालीचे अस्वस्थ होत असून, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी योग्य काळजी घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पालिका कर्मचारी अनिल येवले यांनी अंत्यविधीसाठी आमची चमू कुठेही कमी पडणार नाही, मदतीला धावणार, असा शब्द दिला.