हिंगणघाट : स्थानिक आर.एस.आर. मोहता मिल्स या कापड गिरणीत कमलाकर वामनराव ढगे (५८) रा. बिडकर वॉर्ड या कंत्राटी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संतप्त कामगारांनी उद्योग व्यवस्थापनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. दुपारी ३.३० वाजतापर्यंत सुरू असलेल्या वाटाघाटीअंती व्यवस्थापनाने नमती भूमिका घेत मृतकाच्या कुटुंबीयांना सात लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. यातील दोन लाख रुपये घटनास्थळी आणि उर्वरित पाच लाख कामगार न्यायालयात देणार असे ठरले. यानंतर कामगारांनीही आंदोलन मागे घेतल्याने तणाव निवळला. तब्बल साडेसहा तासांनी पोलिसांनी मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी घटनास्थळावरुन हलविला.प्राप्त माहितीनुसार, आर.एस.आर. मोहता मिल्स या कापड गिरणीत कमलाकर ढगे हा कंत्राटी कामगार सकाळी ७ वाजताच्या पहिल्या पाळीत कामावर गेला होता. काम करीत असताना दोन तासांनी अचानक तो भोवळ येऊन जागीच कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता गिरणीत पसरताच कामगारांनी हातची कामे टाकून घटनास्थळ गाठल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. शहरातही या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच ठाणेदार मोतीराम बोडखे यांनी पोलीस ताफ्यासह धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. संतप्त कामगारांनी मृतकाच्या कुटुंबीयांना १५ लाख नुकसान भरपाई द्यावी. तसेच उद्योगाचे अध्यक्ष यादव यांना मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी, तोपर्यंत घटनास्थळावरुन मृतदेह उचलू न देण्याचा पवित्रा घेतला. दुपारी ३ वाजतापर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याची इशाराही कामगारांनी दिल्यामुळे व्यवस्थापन पेचात पडले. अखेर कामगार आणि व्यवस्थापनात झालेल्या वाटाघाटीनंतर समेट घडून आला. या वाटाघाटीत कामगार नेते आफताब खान, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांच्यासह काही कामगारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मृत कामगार गत ३० वर्षांपासून याच उद्योगात कंत्राटी कामगार म्हणून पवार नामक कंत्राटदाराकडे कामाला होता.(तालुका प्रतिनिधी)
कंत्राटी कामगाराच्या मृत्यूने कापड गिरणीत तणाव
By admin | Updated: July 20, 2014 01:10 IST