बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन : जमिनीबरोबर पिकांचीही गुणवत्ता सुधारली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कमी मेहनतीत भरघोस उत्पन्न घेण्याच्या मोहात शेतकरी भरमसाठ रासायनिक खताचा वापर करून शेतजमीन प्रदूषित करतो आहे. हे संशोधनासह बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांनी रासायनिक खत व पारंपरिक अमृतपाणी या दोन्हीच्या माध्यमातून शेती केली. सात महिन्याच्या प्रयोगाअंती आलेल्या निष्कर्षातून रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्याची गुणवत्ता कितीतरी पटीने सरस ठरली. निव्वळ पीकच नाही, तर जमिनीची गुणवत्ता देखील सुधारली. बायोटेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षाला शिकणारे राहुल सातपुते व आदित्य शिंगोटे या विद्यार्थ्यांनी ‘बायोवेस्ट टू बायोफर्टिलायझर’ या विषयावर संशोधन केले. यासाठी त्यांना नीरी व गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांचे सहकार्य मिळाले. देवलापारला या विद्यार्थ्यांनी एक एकर शेतीत गहू पेरला. त्यात त्यांनी २४ प्लॉट पाडले. यात १८ प्लॉटमध्ये अमृतपाणी दिले. ३ प्लॉटमध्ये कुठलीच ट्रीटमेंट दिली नाही. तर ३ प्लॉटमध्ये रासायनिक खतांचा वापर केला. गव्हाची पेरणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षण केले. दर महिन्याला ते अमृतपाण्याच्या प्लॉटमधील पिकांना अमृतपाणी द्यायचे. तर रासायनिक खतांच्या प्लॉटमध्ये रासायनिक खत द्यायचे. पेरणी केल्यानंतर ते पीक हातात येईपर्यंत लागलेल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सुद्धा मातीचे परीक्षण केले. नीरीमध्ये त्यांनी सीएचएनएस अॅनालायझर, जेलदाल अॅप्रेटस, फ्लेज फोटोमिटर आणि आसीपी-ओईएस या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीतील उपलब्ध नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि मेटल्सचे निरीक्षण केले. यात निरीक्षणात रासायनिक खतांच्या तुलनेत अमृतपाण्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढत गेली. सात महिन्यानंतर पीक हातात आल्यानंतर पिकांचे सुद्धा निरीक्षण केले. विशेष म्हणजे अमृतपाणी दिलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव आढळला नाही. बायोवेस्ट कमी आले. दाण्याचे न्युट्रीशन मूल्य व वजनसुद्धा वाढले.
रासायनिक खतावर अमृतपाण्याचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:53 IST