लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: पूर्व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली आणि मौदा तालुक्यातील माथनी येथील पुलाची, पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची व जलवाहिन्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सालई येथील पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम करताना जमिनीतील काठिण्यता, पुराच्या पाण्याची मारकक्षमता आदी तांत्रिक बाबींचा विचार करणे आवश्यक होते तर माथनी येथील इंग्रजकालीन पूल असल्यामुळे तो पूल तात्काळ किरकोळ दुरुस्ती करुन हलक्या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत व्यास यांनी सूचना केल्या. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी मिळणे आवश्यक असून, त्याबाबत मंत्रालयाकडे तशी माहिती सादर केली जाईल. मात्र राज्य शासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये या बाबी प्रकर्षाने स्पष्ट करण्याच्या सूचना केल्या.
पायाभूत सुविधांसाठी आणखी मदतीची गरज
नागपूर विभागात ३०, ३१ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत ४९ कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी ३९ कोटी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत ३९ कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित १० कोटी रुपयाचे वितरण लवकरच करण्यात येत आहे.
चौकशी करणार -जिल्हाधिकारी
केंद्रीय पथकासमोर अनेकांनी आपल्या मागण्या सादर केल्या. त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यापूर्वी पंचनामे केल्यानंतर याद्या ग्रामपंचायतीमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले होते. पंचनामा केल्यानुसार नुकसान भरपाईबाबत तक्रारी असल्यास त्याची चौकशी केली जात असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मदतीचे वाटप, पंचनामे आणि आणखी कोणत्या क्षेत्रांमध्ये मदतीची गरज आहे, यासाठीच केंद्रीय समितीचा हा पाहणी दौरा असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ४८८ गावातील ४५ हजार ७२४ शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे.