आज जागतिक लोकसंख्यादिन : वाढतोय आलेखनागपूर : ११ जुलै १९८७ रोजी जगात ५ अब्जावे अपत्य जन्माला आले; तेव्हापासून हा दिवस विश्वलोकसंख्या दिन म्हणून जगभर पाळला जातो. १९८७ ते २०११ पर्यंत विश्वलोकसंख्या २ अब्जाने वाढली. लोकसंख्येचे हे आकडे अगदी ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. आपले नागपूरही त्याला अपवाद नाही़ २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येत १४.३९ टक्के वाढ झाली आहे़ १४ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार १७१ इतकी आहे़ यातील नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ५ हजार ९११ इतकी आहे़ एका अहवालानुसार बाहेरच्या राज्यातून पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या चार शहरातही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. त्याचाही लोकसंख्या वाढीवर परिणाम होत असून, शहराचा आकार वाढत चालला आहे़ भारतात जनगणनेला १३० वर्षांचा इतिहास आहे. भारतासारख्या बहुभाषिक आणि बहुधर्मीय देशातील नागरिकांची सांख्यिकीय माहिती गोळा करण्याचे हे एकमेव माध्यम आहे. १८७२ पासून दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. यात अद्याप खंड पडला नाही. २०११ मध्ये करण्यात आलेली जनगणना ही देशातील १५ वी जनगणना होती. या जनगणनेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. २००१ मध्ये ती ९,६८,७८,६७२ होती. २००१ ते २०११ या काळात लोकसंख्येत १,५४,९४,३४५ ने वाढ झाली. लोकसंख्येत पहिला क्रमांक ठाणे जिल्ह्याचा लागतो. नागपूर जिल्हा ९ व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ४६,५३,१७१ असून, त्यात २३,८८,५५८ पुरुष आणि २२,६४,६१३ महिलांचा समावेश आहे. १९०१-१९११ ते २००१-२०११ या कार्यकाळात नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीच्या दरात चढउतार पाहायला मिळतो. १९०१ ते ११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ७.७२ टक्के होता. पुढच्याच दशकात म्हणजे १९११-२१ या काळात तो उणे २.०३ पर्यंत खाली आला. त्यानंतर १९२१ ते ३१ या दशकात त्यात पुन्हा वाढ होऊन १८.६१ टक्के झाला. १९३१-४१ या दशकात कमी (१२.७६) झाला. १९४१ -५१ या दशकात पुन्हा वाढला (१६.७६). १९५१ ते १९८१ या काळात लोकसंख्या वाढीचा आलेख चढताच होता. १९८१ मध्ये ३३.२६ टक्के वाढ नोंदवली गेली. १९८१-९१ या दशकात पुन्हा घट(२६.९७) झाली.१९९१-२००१ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर २३.७४ होता २००१-२०११ मध्ये तो १४.३९ झाला. लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे काही प्रमाणात नागपुरातील स्थानिक लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आले असले तरी बाहेरून येऊन येथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे़ नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा बनणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई, पुण्यानंतर नागपूर शहराला राज्यात विशेष स्थान प्राप्त होणार आहे़ म्हणूनच या शहराचे आकर्षण वाढत असून नागपुरात स्थायिक होणाऱ्यांचा आलेखही वेगाने विस्तारत आहे़ (प्रतिनिधी)
नागपूरवर स्थलांतरितांचे ओझे !
By admin | Updated: July 11, 2014 01:25 IST