नागपूर : मानवाला दु:खापासून मुक्ती देण्याचे काम बुद्ध धम्म करतो. यामुळे विज्ञानावर आधारलेल्या बुद्ध धम्माचा प्रसार जगात झपाट्याने होत असल्याचे मत बुद्ध महोत्सवात उपस्थित थायलँड, अमेरिका, जपानच्या मान्यवर वक्त्यांनी आज येथे व्यक्त केले.नागपूर बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सव २०१५ मध्ये विविध देशातून आलेल्या बौद्ध बांधवांनी बुद्ध धम्माविषयीच्या भावना व्यक्त केल्या. व्यासपीठावर अमेरिकेचे धम्मचारी वीरधम्म, धम्मचारिणी विमल्सारा, जपानचे तोशी अराई, धम्मचारी अमोघ सिद्धी उपस्थित होते. धम्मचारी वीरधम्म म्हणाले, अमेरिकेत ३० लाख बौद्ध असून त्यातील ७५ टक्के बौद्ध बांधव उच्चशिक्षित आहेत. रोज सकाळी ते ध्यानासाठी बौद्ध केंद्रात जातात. विविध देशातील बौद्ध बांधवांचे अमेरिकेत वेगवेगळे बौद्ध केंद्र आहेत. अमेरिकेतील सिनेकलावंतही बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. अमेरिकेत सहा वर्षाच्या मुलांना बुद्धाचे ध्यान कौशल्य शिकविण्यात येते. अमेरिकेतील बौद्ध बांधव तुरुंगातील कैद्यांना ध्यान शिकविणे, रुग्णांना मदत करतात. अमेरिकेतील नागरिक त्यांच्या पारंपरिक धर्मापासून असंतुष्ट असल्यामुळे ते बुद्ध धम्माकडे वळले.जपानचे धम्मचारी तोशी अराई म्हणाले, जपानी लोक भारत बुद्धाची भूमी असल्यामुळे भारताला आदर्श मानतात. जपानवरून अनेक बौद्ध भारतात येतात. भविष्यात जपान आणि भारतातील बौद्धांमध्ये चांगले आदानप्रदान होईल. थायलँडचे भंते कॅनमँग यांनी नागलोकमध्ये भगवान बुद्धाची मूर्ती दान देण्यासाठी आलो असून येथील बुद्ध महोत्सव पाहून मनाला आनंद झाल्याचे सांगितले. धम्मचारिणी विमल्सारा म्हणाल्या, भारत हे माझे आध्यात्मिक घर आहे. बुद्धाची भूमी असल्यामुळे मी भारतात सुरक्षित आहे. यावेळी अनिल कवडे आणि विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. (प्रतिनिधी)
विज्ञाननिष्ठ असल्यामुळे बौद्ध धम्म वाढला
By admin | Updated: January 24, 2015 02:19 IST