हायकोर्ट : वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रकरणनागपूर : शासनाने बारामती येथील नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी कोणताही विलंब न करता १०० कोटी रुपये दिले आहेत. पण चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अद्याप निधीची प्रतीक्षा आहे. अॅड. अनिल किलोर यांनी आज, बुधवारी ही बाब मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांना यावर्षीपासूनच एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश देता यावा, यासाठी चंद्रपूर येथील महिला व बाल रुग्णालयाची इमारत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तात्पुरती देण्यात यावी, याकरिता राहुल पुगलिया व रामदास वागदरकर यांनी रिट याचिका दाखल केली आहे. परंतु मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने केंद्र शासनाकडे नकारात्मक शिफारशी केल्यामुळे व निर्धारित मुदत संपल्यामुळे, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात यावर्षीपासून प्रवेश देण्याची शक्यता मावळली आहे. आता पुढच्या वर्षी या महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी आवश्यक तेवढा निधी व सोयीसुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यामुळे अॅड. किलोर यांनी वरील माहिती देऊन विदर्भावर वारंवार होण्याऱ्या अन्यायाचा उल्लेख केला. अॅड. किलोर याचिकेत दुरुस्ती करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला निधी व सुविधा योग्य वेळेवर उपलब्ध करून देण्याची नवीन विनंती समाविष्ट करणार आहेत. यासाठी न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने चंद्रपूर येथे १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेचे महाविद्यालय व ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ३ जानेवारी २०१३ रोजी जीआर काढण्यात आला आहे. महाविद्यालय व रुग्णालयासाठी १० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
बारामतीला १०० कोटी चंद्रपूरला डावलले
By admin | Updated: July 17, 2014 01:08 IST