सावनेर : शिक्षक ३० ते ३० वर्षे एका चाकोरीत प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे निरंतर कार्य करतो. विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार विरोधी धडे शिकवितो. समाजासमक्ष आदर्श घडवितो. अशा शिक्षकांना मात्र सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठी चिरीमिरीशिवाय पर्याय उरत नाही. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागात चकरा माराव्या लागतात. ही अत्यंत दु:खद बाब आहे. हे विदारक चित्र जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत तिसऱ्या माळ्यावर दिसते. येथे काही वेळ बसून राहिल्यास अनेक जण आपल्या व्यथा व्यक्त करतात. या कार्यालयाचा कुणीही कर्मचारी शिक्षकांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस करीत नाही. टाळाटाळीचे उत्तर मिळते. काही शिक्षक तीन महिन्यांपासून चक्रा मारतो आहे असे सांगताना दिसतात, तर कुणाचा मुलगा सहा महिन्यांपासून माझ्या वडिलांची पेन्शन आली नाही असे सांगताना दिसतो; पण कर्मचाऱ्यांना याचे काही देणे-घेणे दिसत नाही. तेव्हा शिक्षक हतबल होऊन दुसरा मार्ग शोधतात. या कार्यालयातील चपराशी वेगळ्याच तोऱ्यात वावरतो. जसे काही सर्व त्याच्याकडेच सोपविले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोषागार, ए.जी. कार्यालय या सर्वच कार्यालयांचा भार त्याच्यावरच आहे असे तो दर्शवितो. आश्चर्यजनक बाब म्हणजे जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजविल्यावर फाईल उपसंचालक कार्यालय किंबहुना पुढील अन्य प्रक्रियेसाठी पाठविली जाते, तेव्हा त्या फाईलवर शिक्षण अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के नसतात. हे त्या शिक्षकाला कसे कळणार? ते पेन्शनच्या आशेने बसतात. कालांतराने त्यांची पुन्हा धावपळ सुरू होते. आता नेमकी फाईल कुठे आहे, असा प्रश्न त्यांना पडतो. मग रजिस्टरची शोधाशोध सुरू होते. या विषयाकडे शिक्षक संघटनांनी प्रशासनाचे लक्ष केंद्रित करणे निश्चितच गरजेचे आहे.
सेवानिवृत्त शिक्षक पेन्शनच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST