उमरेड : उमरेड शहरात स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे ४० खाटांचे कोविड सेंटर आहे. सध्या याठिकाणी बेड अपुरे पडत असल्याने येत्या काही दिवसात १०० खाटांचे नवीन कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. शुक्रवारी नगरपालिकेत झालेल्या सभेत सदर निर्णय घेण्यात आला. आ. राजू पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया यांची यावेळी उपस्थिती होती. नवीन कोविड सेंटरसाठी नूतन आदर्श महाविद्यालय अथवा स्व. देवरावजी इटनकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागेचा वापर केला जाणार आहे.
ग्रामीण रुग्णालयालगतच ही व्यवस्था करण्यात येणार असून, यामुळे रुग्णालयातील आरोग्य अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी लक्ष पुरवितील आणि सहकार्य करतील, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम यांनी दिली. नगरसेवक सतीश चौधरी यांनी कोविड सेंटर येथे स्वयंसेवक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ऑक्सिजन पुरवठा, औषधी आदी विपुल प्रमाणात उपलब्ध व्हावे, असाही सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
५० बेडची मदत
उमरेडच्या कोविड सेंटरसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ५० बेड आणि तेवढेच बेडसाईड टेबल दोन दिवसात तातडीने पाठविणार असल्याची माहिती दिली. कोविड सेंटरमध्ये उत्तम व्यवस्था व्हावी, याकरिता सर्व लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे.