महिलेच्या तक्रारीने पोलीस संभ्रमात : चौकशी सुरूनागपूर : अंगारे, धुपारे करून आपल्यावर सासऱ्यामार्फत अत्याचार केला जातो, अशी तक्रार एका महिलेने प्रारंभी पाचपावली आणि नंतर कळमना ठाण्यात दिली. या महिलेच्या घरातील कौटुंबिक वादाच्या यापूर्वीही पोलिसांकडे तक्रारी असल्यामुळे पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. तक्रारकर्ती माधवी (नाव काल्पनिक वय अंदाजे ३० वर्षे ) कळमन्यातील भरतवाड्यात राहते. २००६ ला तिचे पहिले लग्न झाले. २०११ पर्यंत तिचा संसार सुरळीत होता. नंतर गेल्या वर्षी तिचा भोजराजसोबत गांधर्व (दुसरा) विवाह झाला. १ जूनला तिच्याकडे पतीचे नातेवाईक आले. महिलांमहिलांमध्ये भांडण झाले. ते ठाण्यात पोहचले. यानंतर चुलीवर स्वयंपाक करावा लागतो म्हणून माधवीने भोजराजमागे गॅसची मागणी केली. गरिबीमुळे त्याने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. या पार्श्वभूमीवर, माधवी, भोजराज आणि दोन्हीकडील नातेवाईकांनी भाग घेतल्याने मोठे भांडण झाले. त्याची २ जुलैला पुन्हा पोलिसांकडे तक्रार झाली. पोलिसांनी घरगुती वाद, त्यात दोन्हीकडील गैरअर्जदार गरीब असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी माधवी पाचपावली ठाण्यात पोहचली. आपल्याकडे नेहमी एक मांत्रिक येतो. तो अंगारे धुपारे करतो आणि अंगारा खाल्ल्यामुळे आपणाला गुंगी येते. अशा अवस्थेत आपल्याशी सासरा नको तो प्रकार (अत्याचार) करतो, अशी तिची तक्रार होती. ती भरतवाड्यातील रहिवासी असल्यामुळे प्रकरण कळमना ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पाचपावलीचे पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी माधवीसोबत एक महिला पोलीस कर्मचारी देऊन तिला पोलिसांच्या वाहनाने कळमना ठाण्यात पाठविले. (प्रतिनिधी)कुणावर अन्याय होऊ नयेकळमनाचे ठाणेदार एस. बंडीवार यांनी माधवीची तक्रार घेतल्यानंतर तिची चौकशी केली. मात्र, अनेक प्रश्नांची ती समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. ज्या सासऱ्याविरुद्ध तिने आरोप लावला. ते ६५ वर्षांचे आहे. घरची स्थिती गरिबीची आहे. यापूर्वी झालेल्या परस्परविरोधी तक्रारी, हा वाद महिला सेलकडे समुपदेशनासाठी गेला असताना महिला अधिकाऱ्यांसमोर कधीही उपरोक्त आरोपाचा उल्लेख झालेला नाही. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण ‘फॅब्रिकेटेड‘वाटत आहे. कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून आम्ही या तक्रारीची सूक्ष्म चौकशी करणार असल्याचे पोलीस सांगत आहेत.
अंगारे, धुपारे अन् अत्याचार
By admin | Updated: July 10, 2014 00:49 IST