अत्याधुनिक संसाधनांनी सुसज्ज : सुरक्षेतही विमानतळ दक्षनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज असल्याची बाब लोकमतने शनिवारी विमानतळावर उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे आणि सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढे आली आहे. सोमवारी रात्री बँकॉकहून इस्तंबूलकडे जाणाऱ्या तुर्की एअरवेज विमानाच्या शौचालयातील आरशावर लिहिलेल्या ‘बम इन कार्गो’ या एका ओळीने क्रू सदस्य गर्भगळीत झाला. याची माहिती वैमानिकाला मिळताच त्याने नागपूर एटीसीला आपातकालीन लॅन्डिंगचा संदेश पाठविला. त्यावेळी विमान भोपाळच्या पुढे गेले होते. नंतर दिल्ली येथे विमान उतरविण्यात आले. हे विमान नागपूर विमानतळावर का उतरले नाही, ही बाब सर्वांना खटकली. हे विमान दिल्ली येथे जाण्याऐवजी नागपूर विमानतळावर उतरविता आले असते का? या प्रश्नाचे उत्तर भारतीय विमान प्राधिकरणाचे विशेष कार्यकारी अधिकारी शफीक शाह यांनी लोकमतशी बोलताना दिले. शाह म्हणाले, वैमानिकाने दिल्ली विमानतळावर आपातकालीन लॅन्डिंगची परवानगी मागितली होती. आम्ही हॉटलाईनद्वारे दिल्लीला या घटनेची माहिती दिली. हे विमान नागपुरात उतरू शकले असते. आपातकालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविणारी अत्याधुनिक संसाधने विमानतळावर आहेत. त्यांच्या दाव्याची लोकमतने तपासणी केली. विमानतळावर आधुनिक ‘बंब’नागपूर : शहराच्या अग्निशमन विभागाच्या तुलनेत नागपूर विमानतळावर दोन आधुनिक अग्निशमन बंब उपलब्ध असल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी लोकमतशी बोलताना दिली. मनपाचे बंब आग विझविताना पुढे-पुढे जात नाहीत.पण विमानतळावरील महागडे आणि आयातीत क्रॅश बंब आग विझविताना पुढे-पुढे जात पाणी सोडतात. हे बंब नसल्यास आंतरराष्ट्रीय विमानन नियमानुसार आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा होणार नाही. नागपूर विमानतळावर अद्ययावत बंब असल्यामुळे शारजाह, बँकॉकसह हज यात्रेसाठी विशेष विमान सेवा उपलब्ध करण्यात येते. हज यात्रेदरम्यान विमानतळावर नागपूर मनपाच्या अग्निशमन विभागाचे बंब अतिरिक्त ठेवण्यात येतात. (प्रतिनिधी)विमानतळ-मनपा अग्निशमन विभागाची हॉटलाईनने जोडणीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मनपाचा अग्निशमन विभाग ‘हॉटलाईन’ने जोडला आहे. अनुचित घटनेची सूचना हॉटलाईनद्वारे अग्निशमन विभागाला त्वरित मिळते. त्यानंतर जवळच्या नरेंद्रनगर फायर स्टेशनवरून जास्त पाणी साठवणुकीच्या क्षमतेचे अग्निशमन बंब (फायर टेंडर) विमानतळावर पाठविण्यात येतात. मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले की, शहरातील आठ फायर स्टेशनचे २२ बंब १२ महिने २४ तास सतर्क असतात. हॉटलाईनद्वारे विमानतळावर अनुचित घटना घडल्याची सूचना मिळताच अधिक फोम तयार करणाऱ्या रसायनाने भरलेल्या बंबाला रवाना करण्यात येते. वेळोवेळी मॉक ड्रीलही करण्यात येते. शहर पोलीस तत्परनागपूर विमानतळावर अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलीस तत्परता दाखवितात. सोनेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले की, विमानतळावर अनुचित घटनांवर नियंत्रण मिळविण्याठी विमानतळ प्रशासन सक्षम आहे. नैसर्गिक आपत्ती आणि आपातकालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याची त्यांची योजना असते. सीआयएसएफ जवानही तैनात असतात. पण बाहेरील भागात अनुचित घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विमानतळ प्रशासन पोलीस नियंत्रण शाखेच्या माध्यमातून सोनेगांव पोलिसांची मदत घेते. बॉम्बस्फोट, आग, विमान दुर्घटना या सारख्या मोठ्या घटना विमानतळावर अद्याप घडलेल्या नाहीत.
आपातकालीन परिस्थितीसाठी विमानतळ सज्ज
By admin | Updated: July 12, 2015 03:04 IST