गोसेखुर्द : तीन महिन्यात अहवालनागपूर : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्क या संस्थेसोबत विभागीय आयुक्त कार्यालय आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्तवतीने करार करण्यात आला.आयुक्त कार्यालयात बुधवारी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील ५१ आणि भंडारा जिल्ह्यातील ३४ गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. प्रकल्पबाधित कुटुंबांचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणासोबतच नागरी सुविधांची झालेली कामे व रोजगाराच्या संधी याबाबत ही संस्था माहिती संकलित करणार आहे. काय स्थिती आहे याचा अहवाल ही संस्था तीन महिन्यात सादर करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तत्पूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसबंधी विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात पॅकेजचे वाटप, गावांचे स्थलांतरण आणि प्रकल्पग्रस्तांसाठी पुरविण्यात आलेल्या नागरी सुविधांची माहिती घेतली तसेच काही सूचनाही केल्या. बैठकीला नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी माधवी खोडे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता अशोक खापरे, विभागीय उपायुक्त (पुनर्वसन) एस.जी. गौतम, राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे आणि मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्कचे प्राचार्य जॉन मेन्चॉरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांच्या सर्वेक्षणासाठी मातृसेवा संघासोबत करार
By admin | Updated: July 18, 2014 01:05 IST