प्रथमवर्ष प्रवेश क्षमतेत वाढ :१० टक्के जागांचा ‘बोनस’ नागपूर : बारावीचा निकाल लागून महिना उलटला तरी अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाहीत. निकालात झालेली वाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१४-१५ या सत्रात मंजूर प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जास्त प्रवेशास मंजुरी दिली आहे. यंदा बारावीच्या निकालात १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यातच किमान शिक्षक नियुक्तीच्या कडक निकषांमुळे अनेक महाविद्यालयांनी विनाअनुदानित जागांवर प्रवेश देणे बंद केले आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम ८३ (३)(सी) नुसार विद्यापीठाला प्रवेश क्षमता मंजुरीचे असलेल्या अधिकारांतर्गत मंजूर प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जास्तीचे प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात मंजूर प्रवेश क्षमतेनुसार, प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असल्यास १० टक्के जास्तीचे प्रथम वर्षासाठी प्रवेश मंजूर करण्याकरिता विद्यापीठाकडे तसा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. यासंबंधी प्रस्ताव सादर करताना महाविद्यालयांना मंजूर क्षमतेनुसार प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रमाणित करून प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक राहील. त्यानुसार महाविद्यालयांना प्रवेशक्षमता वाढवून देण्यात येईल. ही वाढीव क्षमता चालू सत्रासाठीच राहणार असल्यामुळे महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारची नवीन तुकडी तसेच अतिरिक्त पद मंजूर केले जाणार नाही, अशा सूचना विद्यापीठाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)
प्रवेश हवाय, नो टेन्शन
By admin | Updated: July 10, 2014 00:59 IST