हायकोर्टाचा खुलासा : पुरावे सिद्ध करणे आवश्यकराकेश घानोडे -नागपूर आरोपी केवळ उद्देशामुळे दोषी ठरत नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. आरोपीला दोषी ठरविण्यासाठी केवळ हत्येचा उद्देश पुरेसा नसून सरकारी पक्षाने अन्य परिस्थितीजन्य पुरावेही सिद्ध करणे आवश्यक असल्याचा खुलासा न्यायालयाने केला आहे.अमरावती जिल्ह्यातील या प्रकरणात आरोपीच्या पत्नीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. आरोपीचा तिच्या चारित्र्यावर संशय होता. ती एकदा गैरपुरुषासोबत दिसून आली होती. यामुळे आरोपीने तिची हत्या केल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. वैद्यकीय अधिकाऱ्याने तिचा मृत्यू पाण्यात बुडण्यापूर्वी झाल्याचा अहवाल दिला होता. विहिरीत पडताना लोखंडी अँगल किंवा मोटरपंपाचा लोखंडी ढाचा लागून तिचा पाण्यात कोसळण्यापूर्वीच मृत्यू होऊ शकतो, असे मतही वैद्यकीय अधिकाऱ्याने व्यक्त केले होते. घटना पुढे आली तेव्हा एका महिलेने आरोपी व त्याच्या पत्नीला विहिरीत एकत्र पाहिले होते. सरकारी पक्षाने या महिलेचे बयान घेतले नाही. यामुळे दोघेही कोणत्या परिस्थितीत विहिरीच्या आत गेले ही माहिती पुढे आली नाही. सरकारी पक्ष उद्देश वगळता आरोपीला दोषी सिद्ध ठरविता येईल असे कोणतेही पुरावे सिद्ध करू शकला नाही. या बाबी लक्षात घेता न्यायालयाने वरील खुलासा करून आरोपीला निर्दोष सोडण्याचे आदेश दिलेत.रामकृष्ण रामरतन धोत्रे (२९) असे आरोपीचे नाव असून तो दिया, ता. धारणी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव ललिता आहे. त्यांचे २००१ मध्ये लग्न झाले होते. आरोपी खासगी ट्रकवर क्लिनर म्हणून कार्य करीत होता. खटल्यातील माहितीनुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतर आरोपी ललिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाईट वागायला लागला. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी ललिताने वडील मधुकर उमरकरला तिच्या जीवाला धोका असल्याचे व माहेरी परत घेऊन जाण्यास सांगितले होते. ४ एप्रिल २००८ रोजी सकाळी ७ च्या सुमारास मधुकरला ललिताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याचे फोनवरून कळविण्यात आले. यानंतर मधुकरने ७ एप्रिल रोजी धारणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. यावरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१, ४९८-अ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
आरोपी केवळ उद्देशामुळे दोषी ठरत नाही!
By admin | Updated: July 9, 2014 00:55 IST