पवनी येथील गोळीबारप्रकरण : पोलिसांची शोधमोहीम सुरूदेवलापार : पवनी येथे देशीकट्ट्यातून तीन गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यानंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. दरम्यान, या गोळीबार प्रकरणातील मृतावर आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हजारो नागरिकांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.धनेश बंसीधर गुप्ता (२७, रा. देवलापार) असे मृताचे आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पवनी येथे मोबाईल दुकानात त्याच्या गोळीबार करून हत्या केली. तर त्याच्या मदतीसाठी धावलेला त्याचा भाऊ स्मित याला आरोपींनी मारहाण केली. याबाबत मृताचा भाऊ स्मित याने दिलेल्या तक्रारीत १५ आरोपी असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७ सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीत इंदल यादव, सुनील यादव, जयसिंग यादव, प्रेमलाल यादव, मलखान तुफान यासह इतर एकूण १५ जण असल्याचे नमूद आहे. या घटनेला एक दिवस होऊनही आरोपींपैकी एकालाही पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. या घटनेतील मृत धनेश याचा मृतदेह दुपारच्या सुमारास पोलिसांच्या कडक बंदोबस्तात देवलापार येथे आणण्यात आला. ज्या वाहनातून मृतदेह आणला त्या वाहनासोबत पोलिसांची दोन वाहने, राज्य राखीव बल, दोन कमांडो पथक असा एकूण ५० ते ६० जणांचा पोलीस ताफा होता. मृताच्या घरी आधीच हजारोच्या संख्येत नागरिक होते. त्यामुळे नागरिकांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. देवलापार येथे पोलिसांचा ताफा तैनात असून छावणीचे स्वरूप आले आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)
पोलिसांना गवसले नाहीत आरोपी
By admin | Updated: July 18, 2014 00:59 IST