नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. प्रधान सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना राणा प्रतापनगर पोलिसांच्या हद्दीतील आहे.
किशोर रामदास मोहर्ले (३४) असे आरोपीचे नाव असून तो भाग्यश्रीनगर येथील रहिवासी आहे. ही घटना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ११ वर्षे वयाची होती. आरोपीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार केला, अशी पोलीस तक्रार होती. पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. ठाकूर यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे ॲड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.