सुमेध वाघमारे
नागपूर : राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयातीलच (आरटीओ) जवळपास ६५ टक्के वाहने भंगार झाली असताना ती रस्त्यावरून धावत आहेत. वाहतूक नियमांच्या अमंलबजावणीची जबाबदारी असलेल्या या विभागाची ही स्थिती म्हणजे, दिव्याखाली अंधाराचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. कालबाह्य झालेली ही वाहने वारंवार बिघडत असल्याने दुरूस्तीवर लाखों रुपयांचा खर्च होत आहे. एखाद्या वाहनाकडून अपघात झाल्यावरच शासन याकडे लक्ष देईल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
नियमानुसार ट्रक व इतर अवजड वाहने जी २ लाखांपेक्षा जास्त किलोमीटर धावल्याचे असेल किंवा १० वर्षे पूर्ण झाले असेल अशा वाहनांचे निर्लेखन (स्क्रॅप) करण्याचा नियम आहे. कार व जीप सारख्या वाहनांसाठी २ लाख ४० हजार किलोमीटर किंवा १० वर्षे पूर्ण आणि मोटार सायकलसाठी ३ लाख किलोमीटर व १० वर्षे पूर्ण झाले असेल अशा वाहनांना निर्लेखन करण्याचे निर्देश आहेत. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. जो विभाग वाहतूक नियमांचे धोरण ठरवितो, त्याच्या अंमलबजावणीसाठी दंडात्मक कारवाई करतो, त्याच विभागातील बहुसंख्य वाहने भंगार झाली आहेत.
- ८८ वाहनांमधून ५८ वाहने १० वर्षांपेक्षा जास्त जुनी
३१ डिसेंबर २०१८ च्या आरटीओ कार्यालयातील जुन्या वाहनांच्या माहितीनुसार परिवहन आयुक्त कार्यालयासह प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये मिळून १०२ वाहने आहेत. यातील ३ वाहने स्क्रॅब करण्यात आली आहेत तर, ११ वाहने बंद पडली आहेत. उर्वरित ८८ वाहनांमधून ५८ वाहने १० व त्यापेक्षा जास्त वर्षे जुनी आहेत. बहुसंख्य वाहनांनी अडीच लाखांपेक्षा जास्त किलोमीटरचे अंतरही कापले असताना रस्त्यावर धावत आहेत.
-परिवहन आयुक्त कार्यालयातच १३ पैकी ९ वाहने १० वर्षे जुनी
परिवहन आयुक्त कार्यालयातच १३ वाहने आहेत. यातील ९ वाहने १० वर्षांपुढील आहेत. यातील २००६ मधील २, २००७ मधील १ तर २०१० मधील ६ वाहने आहेत. विशेष म्हणजे, आरटीओ कार्यालयांनी स्वत:च्याच वाहनाचे ‘फिटनेस’ चाचणी घेतल्यास अनेक वाहने योग्य नसल्याचे सामोर येईल. वारंवार बिघडणाऱ्या या वाहनांचा दुरूस्तीचा खर्चही वर्षाला कोट्यावधीचा आहे. परंतु कोणीच या विषयी बोलत नाही. आरटीओ कार्यालय नव्या वाहनांचा प्रस्ताव पाठविण्यापुरतेच मर्यादित असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार वाहने नादुरुस्त राहत असल्याने याचा प्रभाव दंडात्मक कारवाईवर होत असल्याचेही चित्र आहे.
-रस्त्यावर असलेली जुनी वाहने
वर्ष वाहने
२००४ २
२००६ ३
२००७ ४
२०१० ४९
-कार्यालयानुसार १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची संख्या
मुंबई (वेस्ट) ४
बोरीवली १
मुंबई (ईस्ट) ५
कल्याण१
रत्नागिरी १
कोल्हापूर५
सातारा२
पुणे१
बारामती१
अकलूज १
नाशिक २
श्रीरामपूर२
मालेगाव१
धुळे१
जळगाव३
औरंगाबाद३
जालना १
बीड १
लातूर १
उस्मानाबाद २
नांदेड३
परभणी२
हिंगोली१
बुलडाणा २
यवतमाळ ३
अकोला १
नागपूर (शहर) २
वर्धा१
चंद्रपूर२
गोंंदिया १
भंडारा १