अनेक गंभीर : विविध इस्पितळात उपचारनागपूर : खामला परिसरातील सहकारनगर येथील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात आयोजित एका बर्थडे पार्टीत सुमारे २०० जणांना विषबाधा झाली. त्यापैकी अनेकांची प्रकृती नाजूक असून, त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी घडली. या सभागृहात सहकारनगर भागातील रहिवासी बाळासाहेब सराफ यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर पाहुणे मंडळी उपस्थित झाली होती. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमापूर्वी सभागृहात जल्लोष होता. बुके आणि भेटवस्तू ‘बर्थडे गर्ल’ला देण्यासाठी गर्दीच झाली होती. भोजनाचा कंत्राट एका कॅटररला देण्यात आला होता. पुरी-भाजी, भात आणि पक्वान्नासोबतच पनीर आणि रसमलाई होती. जेवण केल्यानंतर पाहुण्यांना मळमळ सुरू होऊन उलट्या आणि हगवण सुरू झाली होती. या प्रकाराने सभागृहात सर्वत्र तारांबळ उडाली होती. तडफडताना दिसत असलेल्या सहा जणांना खामला, पांडे ले-आऊट येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले. त्यात देशमुख आणि बडेकर कुटुंबातील लोक होते. त्यापैकी चौघांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली होती. उर्वरित दोघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी)सोनेगाव पोलिसांकडून तपासया घटनेची सूचना सर्वप्रथम राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. परंतु घटनास्थळ सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तशी सूचना सोनेगाव पोलिसांना देण्यात आली होती. या पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, ही माहिती मंगळवारच्या दुपारी पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. या पार्टीतील बरेच लोक बाहेरगावाहून आलेले होते. त्यामुळे ते परस्पर आपापल्या गावी उपचार घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासानंतरच याबाबत कळेल.