फसवणुकीनंतर जीवे मारण्याची धमकी : सिंग बंधूंवर गुन्हे दाखल नागपूर : दुकान मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा उचलून दुकानातील नोकरांनी मद्यव्यावसायिकाला चक्क २० लाख रुपयांचा गंडा घातला. ही अफरातफर लक्षात आल्यानंतर मद्यव्यावसायिकाने विचारणा केली असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.संतोष उदयनारायण सिंग (वय ४२) आणि आनंद उदयनारायण सिंग (वय ३८, रा. दोघेही टाकळी फरस) अशी आरोपी बंधूंची नावे आहेत. निशांत ईश्वर अरसपुरे (वय २९, रा. सीतानगर) यांचे एमआयडीसीतील साईनगरात देशी दारूचे (सीएसीएल-३) दुकान आहे. आरोपी संतोष तेथे व्यवस्थापक तर, आनंद वितरक (नोकर) म्हणून कार्यरत होते. अरसपुरे यांची जानेवारी ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत प्रकृती ठीक नव्हती. सिंग बंधूंवर अरसपुरेंचा मोठा विश्वास असल्यामुळे या कालावधीतील दुकानातील मालाची आवक जावक आणि सर्व आर्थिक व्यवहार त्यांनी सिंग बंधूंवर सोपवले. त्याचा गैरफायदा घेत आरोपींनी १९ लाख, ५७ हजार, ७६५ रुपयांची देशी दारू ठोक विक्रेत्यांकडून खरेदी केली. या दारूच्या विक्रीतून आलेली रक्कम ठोक विक्रेत्यांना देण्याऐवजी आरोपी सिंग बंधूंनी ती स्वत:च्या फायद्याकरिता वापरली. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर अरसपुरे यांनी सिंग बंधूंना विचारणा केली. प्रारंभी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र रक्कम परत करण्याऐवजी अरसपुरे यांना मारण्याची धमकी दिली. अरसपुरे यांनी केलेल्या तक्रारीवरून कोर्टाने आरोपी सिंग बंधूंविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे एमआयडीसी पोलिसांना आदेश दिले. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आरोपींना अटक झाली की नाही, ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा
By admin | Updated: July 11, 2014 01:15 IST