नितीन कुलकर्णी
पावसाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचा संवाद ब:याच घरात होत असावा.
बायको : ‘श्शी?? ! काय हा पावसाळा.., मला अजिबात आवडत नाही !’
नवरा : ‘काय सुंदर हवा आहे, किती रोमॅण्टिक वाटतं! चल आपणं लॉँग ड्राईव्हला जाऊ.’
बायको : तूच जा एकटा, मला नाही आवडत ती चिकचिक, तो चिखल, तो दमटपणा, कुंद कुजका वास! हा माझा अगदी नावडीचा सिझन आहे. हे फक्त सिनेमामधे छान वाटतं!’
वरच्या उदाहरणात संवादाची अदलाबदल होऊ शकते, पण आशयातला मथितार्थ चोख आहे. इथल्या बायकोने वर्णन केलेल्या कारणांसाठी पावसाळा न आवडणारे बरेचजण आढळतील. आजकालच्या शहरातल्या धकाधकीच्या जीवनात प्रवास करणो म्हणजे एक महाकठीण काम आहे, आणि त्यात पाऊस म्हणजे काही विचारायला नको. पावसापासून स्वत:चा बचाव करायचा म्हणजे छत्री व रेनकोटचा वापर करणो क्रमप्राप्त आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर स्वत:ची चारचाकी वापरणार नसाल तर छत्री ही हवीच. (अर्थात गाडीत बसेपर्यंत व पार्किंगपासून पुढे छत्री लागतेच.)
छत्री हे साधन अगदी पुरातन काळापासून आपले ऊन-पावसापासून रक्षण करीत आली आहे. छत्रीची कल्पना अगदी साधी म्हणजे एका माणसापुरते छोटेसे छप्पर, जे जिथे तिथे नेऊ शकता येण्याजोगे असेल. छत्रीचे दोन भाग पडतात, गोलाकार उतार असलेले छप्पर व ते धरण्यासाठी मधोमध लावलेली दांडी. या मूळ आकाराचा शोध सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी इजिप्शियन लोकांनी लावला. तेव्हाची छत्री प्रामुख्याने उन्हापासून रक्षण करण्यासाठी वापरली जात होती आणि तीदेखील राजे व उच्च पदस्थ लोकांसाठीच (ज्याला छत्रचामर म्हणता येईल). झाडांच्या फांद्या व सावलीपासून प्रेरणा घेऊन, झाडांची मोठी पाने व लांब पक्ष्यांची पिसे वापरून या छत्र्या बनवल्या गेल्या. पुढे इ.स. पूर्व 11 मधे चायनात चामडय़ापासून बनवलेल्या वॉटरप्रूफ छत्र्या पहिल्यांदा आल्या. या बनवण्यासाठी नंतर बांबू, ऑईल पेपर व सिल्कदेखील वापरले गेले. युरोपात छत्र्यांचा वापर 16 व्या शतकात दिसू लागला आणि तो म्हणजे फ्रान्स व इटलीत. उच्चभ्रू समाजातील महिला यांचा वापर फॅशन म्हणून करू लागल्या. त्यामुळे स्त्रियांच्या वापरातले उंची साधन व पर्यायाने नाजूकपणा याच्याशी जोडलेला होता. पहिल्यांदा पुरुषी छत्री 18 व्या शतकात रुजू झाली. सॅम्युअल फॉक्सने 1852 मधे ही छत्री तयार केली व जॉनस हॅनवे या इंग्लिशमन (एक व्यापारी व समाजसेवक) ही छत्री प्रसिद्ध केली. तो नेहमी लंडनच्या हमरस्त्यांवर बाहेर जाताना छत्री घेऊन निघत असे. (चित्र-1) त्याची छत्री घेतलेली अनेक चित्रं प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हॅनवे हा छत्री या वस्तूचा पहिला ब्रॅँड अॅम्बेसेडर म्हणावा लागेल.
यानंतर पुरुष विनासंकोच छत्रीचा वापर करू लागले असे उल्लेख आहेत. अर्थात त्यावेळचा छत्रीचा वापर व आजचा वापर यात बराच फरक आहे. आज जरी छत्रीचे डिझाइन बरेच बदलले असले तरी आपण अनेक अडचणींचा सामना करत असतो, म्हणजे कुठल्याही वस्तूंबाबत असे म्हणता येतेच, कारण आपल्या जगण्यात झपाटय़ाने बदल होत असतात. त्यामुळे उपलब्ध वस्तूंकडून असलेल्या आपल्या अपेक्षा झपाटय़ाने बदलत असतात. या अपेक्षांची आपल्याला प्रत्येक वेळेस जाणीव असतेच असे नाही आणि कधी कधी वेळोवेळी जाणवूनही सुधारणा केलेली वस्तू बाजारात येतेच असे नाही. कधीकधी ब:याच वर्षांच्या कालावधीनंतर वस्तूची सुधारित आवृत्ती बघायला मिळते. अर्थात अशा प्रकारचे इनोव्हेशन बाजारात यायला बराच अवधी द्यावा लागतो.
छत्रीच्या संदर्भातले असेच एक इनोव्हेशन आपल्याला चकित करून जाईल. याचे नाव आहे काझब्रेला (चित्र-2). एक उत्तम छत्री कशाला म्हणता येईल? अशी छत्री जी धुवाधार पावसात आपल्याला कोरडं ठेवेल आणि पावसातून आत आलं की आतल्या कोरडय़ा भागालादेखील म्हणजे घर, ऑफिस, गाडी इत्यादि. आता हे कसं शक्य आहे बरं? छत्रीवरच्या पाण्याचं थारोळं जमत राहतं. आपण बघितलंय की ऑफिसेसच्या बाहेर रिकाम्या बादल्या ठेवलेल्या असतात आणि इथे छत्र्या ठेवून ब:याच जणांच्या गायब पण होतात. नाहीतर आपण बरोबर एक कोरडी प्लॅस्टिकची पिशवी ठेवतो व त्यात छत्री गुंडाळून आत नेतो. काझब्रेला या सगळ्या त्रसातून मुक्त करू शकते (जर बाजारात उपलब्ध झाली तर). या छत्रीचे डिझाइन वेगळ्या तत्त्वानुसार बनवलं आहे. नेहमीची छत्री बंद करताना तिचा चाप आपण आतल्या बाजूला ओढतो आणि छत्रीची बाहेरची बाजू बाहेरच राहते. त्यामुळे सगळं पाणी जमा होऊन टोकाकडून वाहू लागते. काझब्रेला बंद करताना बाहेरची बाजू आत जाते व आतील कोरडी बाजू बाहेर येते व गुंडाळून ठेवल्यावर पाणी आतल्याआत बंद राहतं. आहे की नाही कमाल?
पावसात छत्री बंद करून गाडीत बसताना कोरडे राहण्याचा प्रयत्न केलाय? इथे असं लक्षात येतं की आत्तापर्यंत प्रयत्नपूर्वक राहिलेल्या कोरडय़ाचं ओलं होऊनच गाडीत बसावं लागतं. जेनान काझमी या डिझायनरकडे याचं पण उत्तर आहे. काझब्रेला छोटय़ातल्या छोटय़ा फटीतदेखील उघड-बंद होऊ शकते.
गर्दीत छत्री उघडताना आपल्याला काडय़ा डोळ्यांत जाण्याची भीती असते. इथे हाही धोका टळतो. कारण छत्री वरच्या बाजूला अलगद उघडते. या छत्रीचे अजून एक वैशिष्टय़ असे की, हवेमुळे ही छत्री अभावानेच उलटी होते आणि जरी झालीच तरी आत वरच्या बाजूच्या एका बटनामुळे ही लगेच पूर्ववत होते. आता हे वर्णन वाचल्यावर असं वाटेल की, जणू काही ही आहे जादूची छडी. खरंतर इथे हे बघायचंय की आपल्या सगळ्यांना भेडसावणा:या अडचणी सार्वत्रिक असतात आणि त्यांवर इनोव्हेशनच्या प्रक्रि येतून नवीन, उपयोगी वस्तुकल्पना जन्म घेते.
अजून एका अशाच अनोख्या छत्रीचे उदाहरण घेऊ. सेंझ नावाच्या या छत्रीच्या डिझाइनद्वारे वा:यामुळे उलटी होण्याच्या अडचणीचे निवारण होते. यात विषमभूजतेचे तत्त्व वापरलेले आहे, जे विमानाच्या आकारावरून स्फुरलेले आहे. आता हेच बघायचे की आपल्याकडे कधी उपलब्ध होणार ही इनोव्हेशन्स?
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत)