डॉ. उज्जवला दळवी
नागमोडी वळणं घेत घेत दूरात दिसेनाशी होणारी वाट, अगदी दगडधोंडय़ांतली, दाट जंगलातली किंवा एखाद्या उत्तुंग पर्वताच्या जीवघेण्या शिखराला बिलगलेली असली तरीही ती वाट माणसाच्या मनाचं पाऊल ओढून नेते. कदाचित आपलं सुखनिधान त्या दूरच्या अदृष्टात दडलेलं असेल ही भावना मनाला व्यापून टाकते. कित्येकदा कारणाशिवायच तशा दूरच्या ठिकाणी जायची तगमग लागते. ‘गतजन्मीच्या रेशीमगाठी कातर हृदयाला करिती’ अशी अवस्था होते, ती विनाकारण नाही. गेल्या किमान सव्वा लाख वर्षांपासून माणसाचं तशा वाटांशी आणि प्रवासाशी अतूट, सामूहिक नातं जुळलेलं आहे.
शिकार करून, फळंमुळं हुडकून पोट भरणा:या आदिमानवाला त्याच्या भोवतालच्या भागात भक्षाची चणचण भासली तेव्हा त्याने अन्नाच्या आशेने, नवे प्रदेश शोधता शोधता पृथ्वीला गवसणी घातली. चाकाचा शोध लागायच्या फार आधीपासून माणसाच्या पायाला चाकं लागलेली आहेत.
सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी माणूस शेतकरी झाला. जमिनीचा कस घटला, कधी अवर्षणाने दुष्काळ पडला किंवा पुराने गाव पाण्याखाली गेला तेव्हा शेतकरी सुपीक जमिनीच्या, पाऊसपाण्याच्या, स्थैर्याच्या शोधात फिरला. तशा हरहुन्नरी धडपडीच्या काळात शेळ्या, मेंढय़ा, गायी माणसाळल्या. मग धनगर, गवळी चा:यासाठी भटकले. त्याच काळात बैल, घोडे नांगरटीला लागले, शेतीची तंत्र सुधारली. सुबत्ता आली.
मुबलक अन्नधान्याच्या जोरावर सैन्य आणि राजे पोसायची समाजाला ऐपत आली. चाकांच्या, घोडे जुंपलेल्या गाडय़ा, रथ आले. लढाऊ पेशांना युद्धाची खुमखुमी होती. मोहिमा झाल्या, अश्वमेध घडले. पराभूतांची त्यांच्या गावांतून हकालपट्टी झाली. ते देशोधडीला लागले. काही जुलमी राजांनी आपल्याच प्रजेची इतकी पिळवणूक केली की नागरिक घरदार सोडून दुस:या राज्यांत आश्रयाला गेले.
प्रजाजनांचे आणि पराजितांचे हाल, युद्धांत झालेलं हत्त्याकांड, अत्याचार वगैरे पापांची जाणीव जेत्यांना, राज्यकत्र्याना छळायला लागली. पापाचं परिमार्जन करायला धर्मस्थापना झाली. नव्या धर्मांचे अनुयायी शब्दांनी किंवा शस्त्रंनी धर्मांचा प्रसार करायला देशोदेशी हिंडले. अनुयायी वाढले.
धर्मसंस्थापनेचं गाव तीर्थक्षेत्र बनलं. दूरदेशींचे भाविक हालअपेष्टा सोसून तीर्थयात्रेला गेले. जगभरातून धर्माचे अभ्यासक तिथे पोचले.
तशा भटकंतीतच ‘केल्याने देशाटन’ होणारे फायदे माणसांच्या ध्यानात आले. ‘चराति चरतो भग:’ हे जाणणारी होतकरू तरुणाई भूकलाडू, तहानलाडूंची शिदोरी घेऊन ‘नशीब आजमावायला’ निघाली. धाडसी व्यापा:यांचे तांडे मालामाल झाले. नशीब तर फळफळलंच पण प्रवासाचीही चटक लागली. कुतूहल, साहस किंवा केवळ आवड म्हणून पायाला चाकं लावणा:यांची संख्या वाढली.
आदिमानवाला ज्या समस्या होत्या त्या इतरही प्राण्यांना होत्याच. पण त्या प्राचीन काळातही मानवजात स्वत:च्या हिमतीवर जशी जगाच्या कान्याकोप:यात पोचली तशी इतर कुठलीही प्राणिजात पसरली नाही. असं कशामुळे झालं?
बहुतेक प्राण्यांच्या हालचाली जीव वाचवणं, खाद्य मिळवणं आणि वंश वाढवणं एवढय़ाच उद्देशाने घडतात. केवळ कुतूहलापोटी नसती उठाठेव करणं हा त्यांचा स्वभावधर्म नाही. मांजरासारख्या काही प्राण्यांना अनेक गोष्टींची नवलाई वाटते. पण त्यातून ती काही शिकत नाही. तो त्यांचा खेळ होतो. शिवाय त्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. जिवाला जपून नव्याचा मागोवा घेणं आणि त्यातून नवी तत्त्वं आणि तंत्र शिकणं हे प्रगत प्राण्यांचं वैशिष्टय़ आहे. म्हणूनच अन्नाच्या शोधात आफ्रिकेतून निघालेला माणूस काही सहस्त्रकांनी का होईना, ऑस्ट्रेलियापर्यंत पोचला आणि तिथला ‘आदि’वासी झाला!
माणसाला भोवतालच्या जगाबद्दल, त्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आणि घटनेबद्दल सतत अदम्य कुतूहल वाटत असतं. जुन्याचं रवंथ करून कंटाळा आला की माणूस त्यावरचा इलाज म्हणून नव्याचं कुतूहल वापरतो. जित्याची खोड बनलेल्या कुतूहलावर मात्र त्याच्याकडे इलाज नसतो. माणसाला लागलेले हे दूरच्या अदृष्टाचे वेध, हे कुतूहल मुळात आलं कुठून?
शास्त्रज्ञांनी त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला.
स्वत:चं अन्न मिळवणं आणि भोवतालच्या धोक्यांपासून स्वत:चा जीव वाचवणं ही जीवनावश्यक धडपड प्राण्यांच्या पिलांना जवळजवळ जन्मापासून करावी लागते. माणसाची मुलं सुरु वातीची दहा-पंधरा र्वष आईवडिलांच्या मायेच्या कवचात सुरक्षित राहतात. अदृष्टाबद्दल कुतूहलाने विचार करायला, आईबापांकडून मौखिक माहिती मिळवायला त्यांना भरपूर वेळ मिळतो. प्रवासाच्या ओढीला खतपाणी लाभतं.
वीस टक्के माणसांत, मुख्यत्वे जास्तीत जास्त प्रवास हौसेने करणा:यांत ती ओढ उपजतच असते. ती ऊफऊ4-71 या जीनशी संबंधित असल्याची शास्त्रज्ञांची अटकळ आहे. डोपामीन नावाचं रसायन मानवी मेंदूत आनंदाची भावना निर्माण करायचं काम करतं.
ऊफऊ4-71 नावाचा जीन त्याला मदत करतो. ज्यांच्याकडे हा जीन असतो ते लोक अधिक चौकस आणि धडपडे असतात. प्रवास करून नवे देश, नव्या चवी, भाषा आणि चालीरिती अनुभवल्या की त्यांना मनसोक्त आनंद होतो. कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांनी आणि नॅशनल जिऑग्राफिक या नामांकित मासिकाच्या संशोधकांनी स्वतंत्रपणो केलेल्या दोन वेगळ्या शोधांतून हे प्रकर्षाने दिसून आलं.
माणूस समाजात राहतो. इतरांशी संवाद साधतो. त्यामुळे एकाचा अनुभव अनेकांपर्यंत पोचवला जातो. ज्यांना उपजतच प्रवासाची ओढ नसते त्यांनाही प्रवासातून मिळणा:या आनंदाबद्दल, इतर लाभांबद्दल माहिती मिळते. ते प्रयोग करून बघतात आणि सरावतात.
मानवजात सुरुवातीपासूनच अनंत अडचणींशी झगडत, चिकाटीने प्रगती करत आली आहे. एका जागच्या अडचणी असह्य झाल्या की तिथून उठून दुसरीकडे जाणं हा सोयीचा उपाय माणसाने नेहमीच वापरला आहे. आता मानस शास्त्रज्ञांनी त्या ‘स्थानत्यागा’चाही अभ्यास केला आहे. भोवतालच्या अडचणींत गुंतलेला माणूस तिथून बाहेर पडला की नव्या अनुभवांनी त्याच्या मेंदूला जाग येते. त्याचे अनुभव अधिक उत्कट होतात. त्यातून विरंगुळा तर मिळतोच पण जुन्या अडचणींवर मात करायच्या नव्या युक्त्याही सुचतात. राज्यकारभाराची धुरा बाजूला ठेवून राजे शिकारीला जात, ¬षी खडतर तपाचरणासाठी हिमालयात जात आणि बौद्ध भिक्षू वर्षाकाठी आठ महिने प्रवास करतात त्यामागचं कारण हेच असावं.
गेल्या सव्वा लाख वर्षांत या ना त्या कारणाने मानवजातीने इतका प्रवास केला की प्रवास करणं हे मानवतेचं लक्षण म्हणता येईल. माणसाच्या त्या सगळ्या प्रवासाची गाथा म्हणजे नराचं नारायण आख्यान. त्यात अनेक उपआख्यानंही आहेत. पुढल्या काही लेखांतून उलगडत जाईल तीच मानवाची भ्रमणगाथा.
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मानवाचा ‘प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, संशोधनाचा विषय आहे.)