दिलीप वि. चित्रे
उत्तरायुष्याच्या वाटेवर खाचखळगेच असतील कशावरून ? त्या वाटांवर सुंदर उद्यानं असतील. फुलं फुलली असतील. आयुष्यामधल्या अत्यंत खडतर घोडदौडीमधे जे पाहायला सवड मिळाली नसेल
ते सारं डोळे भरून पाहता येईल, अनुभवता येईल, मनमुराद लुटता येईल.
-----------
अतिशय उत्साही माणसांनी आणि टवटवीत रंगांनी बहरलेल्या विलक्षण उत्फुल्ल वातावरणात निळ्याशार पाण्याने हेलकावणारा एक सुंदर स्विमिंग पूल आहे.
सरासरी 7क् ते 75 वयातल्या बिकिनीमधल्या ‘तरुणी’ आपल्या सुरकुतल्या अंगावरचे चटोर वाटतीलसे स्वीमिंग कॉश्चुम्स मिरवत त्या पाण्यात मनसोक्त डुंबताहेत आणि थेट कृष्णकाळातल्या गोकुळाला लाजवीलशा त्या अमेरिकन चित्रतल्या ओल्याचिंब गोपींकडे आश्चर्याने पाहत मी शोभासह- माङया पत्नीसह- तिथे थक्क होऊन उभा आहे. शेजारी माझा मित्र.
तो मला म्हणतो आहे, आता रिटायर व्हायचं ठरवताय, तेव्हा इथेच या राहायला आमच्या या गावात! या गावाचं नाव सन सिटी सेंटर!
- होम फॉर द यंग अॅट हार्ट!
मी सणकलोच आहे मनातून. मी वैतागून स्वत:शीच चिडचिडतो.
इथे? करू काय इथे येऊन? या गोप्यांबरोबर मुरली वाजवत गरबा करू की काय?
माङया मनात काय चाललंय हे नेमकं ओळखून असणारा मित्र संधी सोडत नाही. तो मला सुनावतो आहे,
‘‘आयुष्याच्या उत्तररंगात त्यांची कशी धमाल चाललीय बघ. त्यांचा उत्साह बघ. तुला जरी गरबा करायचा नसला, तरी त्याच तुला कडेवर घेऊन नाचतीलसुद्धा! एवढी ऊर्जा आहे त्यांच्यात!!’’
या नुसत्या कल्पनेने मी दचकतो. तेवढय़ात पाण्यातून उडी मारून एक बिकिनी माङयासमोर येऊन ठाकते. माझा हात धरून म्हणते, "Oh dear, do you want to Jump with me?
- काय बोलावं हे न सुचून मी गप्प झालेला बघून शोभाला हसू फुटतं.
शोभा माझी सहधर्मचारिणी. आयुष्याच्या गोरजवेळेचं स्वागत उत्साहाने करून आम्ही दोघेही नव्या प्रवासाला निघण्याच्या उत्सुकतेने अमेरिकेच्या. किना:यावरल्या ‘सनशाईन स्टेट’मध्ये आलो आहोत.
- प्लोरिडा!
आमचा हा भला मित्र आमच्या आधीच निवृत्ती घेऊन तिथे स्थायिक झालेला. त्याचं घर नेमकं ‘सन सिटी सेंटर’मध्ये! ही कम्युनिटी सगळीच रिटायर्ड लोकांची. ‘म्हाता:यांची’ असं म्हणणं हे पापच! कारण या कम्युनिटीचं ब्रीदवाक्यच मुळी 'Home for The Youngs at Heart' असं. मित्र अगदी भरभरून तिथल्या एकेक गोष्टीचं वर्णन करायला लागला तसतसा मी नकळतपणो सन-सिटीच्या प्रेमात पडायला लागलो. मग त्यानं सन-सिटीची रपेट घडवण्यासाठी, तिथले एकेक क्लब्स, अॅक्टिव्हिटीज् दाखवण्यासाठी मला आणि शोभाला - दोघांनाही घराबाहेर काढलं. प्रथम त्यानं नेलं ते तिथलं ‘फिजिकल फिटनेस सेंटर’ पाहायला. ते भव्य जिम्नॅशिअम पाहून मी हबकूनच गेलो. तिथले स्विमिंग पूल्स, स्पाज, जकूझीज वगैरे पाहत फिरताना वाटत होतं, हे कसलं म्हाता:यांचं गाव? इथे तर तरणोच दिसतात की सगळे. आणि सगळ्या!!
तेवढय़ात स्विमिंग पुलात मनसोक्त पोहणारी ती सत्तरीची ‘बिकिनी बया’ आलीच हात धरायला.
नीट विचारपूर्वक ठरवलेली ‘रिटायरमेण्ट’ चांगली पाचेक र्वष दूर असतानाच ‘आपलं दुसरं घरटं कुठल्या गावाच्या उबेला बांधावं?’ हे शोधत शोधत मी आणि शोभा प्लोरिडा राज्यातील टॅम्पाच्या दक्षिणोला पोचलो होतो.
प्लोरिडाची हवा उत्तम. उन्हाळा सुसह्य आणि हिवाळ्यात हिमवादळांचा धाक नाही. त्यामुळे 55+ वयोमर्यादा असलेल्या तरुणांसाठी खास तयार केलेल्या ‘रिटायरमेण्ट कम्युनिटीज्’ हे या राज्याचं खास वैशिष्टय़ आहे. टॅम्पा नावाच्या गावातली ‘सनसिटी सेंटर’ ही अशीच एक वसाहत. ज्येष्ठांसाठीच डिझाइन केलेलं आणि उत्तम निगराणी राखलेलं एक देखणं आखीव-रेखीव गाव. रुंद रस्ते. टुमदार घरं. फ्लोरिडामधल्या हवामानाप्रमाणो घरांची रचना. मागे-पुढे सुंदर बगीचा. घराच्या मागच्या बाजूला गोल्फ कोर्स आणि प्रचंड मोठं तळं. त्याला सर्व बाजूंनी वेढून असलेली घरं. पुढल्या बाजूला उंच उंच पाल्मची झाडं. स्वच्छ रस्ते. गोल्फकार्ट्ससाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वेगळ्या लेन्स. तुरळक पण शिस्तबद्ध वाहतूक. प्रसन्न शांतता.
दीड-दोन मैलाच्या अंतरावरच ग्रोसरी स्टोअर्स, रेस्टॉरण्ट्स, हॉस्पिटल, सर्व प्रकारचे डॉक्टर्स, स्पेशालिस्ट्स, दुकानं, गरजेच्या वस्तू - सगळंच उपलब्ध. ह्या वयातल्या लोकांच्या गरजा कोणत्या याचा विचार प्रत्येक बाबतीत बारकाईने केलेला. घरंही वेगवेगळ्या प्रकारची. 1 बेडरूम, 2 बेडरूम्स, तीन - वगैरे. वेगवेगळ्या राज्यांतून, वेगवेगळ्या व्यवसायांतून, उच्च पदावरून निवृत्त होऊन आलेली सुशिक्षित आणि सुस्थित असलेली माणसं या वसाहतीत एकोप्याने राहतात. एकमेकांवर प्रेम करणारी, मैत्रीचा हात सदोदित पुढे केलेली, स्वत:च्या सुख-दु:खांपलीकडे दुस:यांच्याही सुख-दु:खांची जाण असलेली.
ओळख नसतानाही जो दिसेल-भेटेल तो मुद्दाम थांबून आमची विचारपूस करीत होता,
- ‘‘काय? येणार ना इथं राहायला?’’ असं पुन्हा पुन्हा विचारणा:या माणसांनी आम्हाला प्रेमातच पाडलं. कसला ताण नाही, अभिमान नाही, वर्णभेद तर नाहीच नाही.
वाटलं, राहावं इथे यांच्याबरोबर. उत्तरायुष्याची वाट यांच्या सोबतीने चालायला मजा येईल. त्या वाटेवरले खाचखळगे, चढउतार कुणी पाहिलेत? पण मग एकदम वाटलं, खाचखळग्यांचाच विचार का करतोय मी? त्या वाटांवर सुंदर उद्यानं असतील. फुलं फुलली असतील. निसर्गातल्या विविध रंगांची उधळण असेल. आयुष्यामधल्या अत्यंत खडतर घोडदौडीमधे जे पाहायला सवड मिळाली नसेल ते सारं डोळे भरून पाहता येईल, अनुभवता येईल, मनमुराद लुटता येईल.
निर्णय घेतला. शोभाच्या सोबतीने घरं बघायला सुरुवात केली. आवडलं ते तीन बेडरूम्सचं, 25क्क् चौरस फुटाचं, मागे तळं, गोल्फ कोर्स असलेलं सुंदर घर मग घेऊनच टाकलं.
नंतर तीन-चार वर्षातच दोघेही निवृत्त झालो. अमेरिकेची राजधानी - वॉशिंग्टन डी.सी.; जिथे आम्ही आयुष्यातली 4क्-45 र्वष काढली तिचा जड अंत:करणानं निरोप घेऊन फ्लोरिडात सामान टाकलं.
.आणि आता आयुष्याच्या गोरजवेळेचे रंग पाहत आनंद लुटायला सुरुवात केली आहे.
त्याचीच ही कहाणी!
पूर्वेचा भारत ‘तरुण’ होत असताना, पश्चिमेकडल्या महासत्ता मात्र पांढरे केस आणि थकल्या गात्रंनी ‘रिटायरमेण्ट होम’च्या दिशेने चालू लागल्याच्या बातम्या आज नवल-कौतुकाच्या वाटतात, हे खरं! पण आजचा हा ‘तरुण’ चढणीचा रस्ता उद्या-परवा उताराला लागेल, तेव्हा काय? - हा प्रश्न आत्ता कुठे आपल्या विचारविश्वात येतो आहे.
या प्रश्नाच्या संभाव्य उत्तरांचाअंदाज यावा म्हणून अमेरिकेत खास ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी’ आखलेल्या देखण्या, टुमदार गावांची - व्यवस्थांची सफर घडवून आणणा:या पाक्षिक लेखमालेतील दुसरा लेखांक.
निसर्गनियमाने येणारं वृद्धत्व केवळ सुसह्यच नव्हे, तर आनंदी आणि उत्फुल्ल करण्याच्या या प्रयत्नांची, वृत्तीची लागण आता आपल्याही घरा-गावांना व्हायला हवी, म्हणून!
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह, ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक,
संयोजक, संघटक)